आता अनोळखी कॉलरचे नावही दिसणार | पुढारी

आता अनोळखी कॉलरचे नावही दिसणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम मेसेज आणि कॉल्समुळे देशभरातील ग्राहक वैतागले आहेत. स्मार्टफोन वापरणार्‍यांना अनोळखी कॉलर ही एक डोकेदुखी बनली आहे. यावर उपाय म्हणून आता ‘ट्राय’ नवा नियम आणणार असून, सर्व मोबाईल सेवा देणार्‍या कंपन्यांना कॉलर आयडी प्रणाली सक्रिय करण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनमध्ये अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम मेसेज आणि कॉल्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. आजकाल सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अज्ञात कॉलर ही एक मोठी समस्या बनली आहे. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा
लागत असेल; तर तुम्ही लवकरच यापासून सुटका मिळवू शकता. ‘ट्राय’ लवकरच या समस्येवर तोडगा आणणार आहे.

एका अहवालानुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ अशी प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये देशातील जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल या सर्व कंपन्यांना कॉलर आयडी प्रणाली लवकरात लवकर सक्रिय करण्यास सांगितले आहे. जेणेकरून स्मार्टफोन वापरकर्त्यांना कॉल उचलण्यापूर्वीच कळू शकेल. ‘ट्राय’ने आपल्या कॉलर आयडी प्रणालीला कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनपी) असे नाव दिले आहे. कॉलर आयडी प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्या फोनवर अशा लोकांची नावेदेखील प्रदर्शित करेल, ज्यांचे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले नाहीत. म्हणजे अनोळखी नंबरवरून तुम्हाला कोणी कॉल केला, तर तुम्हाला त्याचे नाव कळेल.

अहवालानुसार, ‘सीएनपी’ सेवा डीफॉल्टनुसार सक्रिय होणार नाही. ही सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरकडे विनंती करावी लागेल. त्यानंतरच ती सेवा सुरू होईल. ‘ट्राय’ची ही सेवा फसवणूक आणि अनोळखी कॉलच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी खूप मदत करू शकते.

कॉलर आयडी अ‍ॅप संकटात

सध्या कॉलर आयडी ओळखण्यासाठी काही अ‍ॅप उपलब्ध आहेत. त्यातील काही सशुल्क आहेत. ‘ट्राय’ने आता थेट मोबाईल कंपन्यांनाच ‘सीएनपी’ सुरू करण्याचे निर्देश दिल्याने या खासगी अ‍ॅपसमोर संकट निर्माण होईल. हे खासगी अ‍ॅप कॉलरचे नाव दाखवण्यासाठी फोन नंबरचा डेटा मिळवतात. त्यातून डेटा सुरक्षिततेबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता या सर्वांनाच चाप बसणार आहे.

Back to top button