पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर एका वर्षाच्या आत पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची शनिवारी पटियाला तुरुंगातून सुटका करण्यात आली. सिद्धू यांना गेल्या वर्षी १९ मे रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्याच्या एका दिवसानंतर २० मे रोजी पटियाला कोर्टासमोर त्यांनी आत्मसमर्पण केले होते. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत २६ जानेवारी रोजी सुटकेस पात्र असतानाही सिद्धू यांना सरकारने विशेष सूट दिली नाही.
त्याच्या सुटकेच्या दरम्यान त्याचे शेकडो समर्थक त्याचे स्वागत करण्यासाठी तुरुंगाबाहेर जमले होते. त्याच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, सिद्धू यांची चांगल्या वागणुकीमुळे लवकर सुटका करण्यात आली आहे, असे पीटीआय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
या देशात जेव्हा जेव्हा हुकूमशाही आली तेव्हा क्रांतीही आली आणि यावेळी त्या क्रांतीचे नाव आहे राहुल गांधी. ते सरकारला धारेवर धरतील, अशी पहिली प्रतिक्रिया नवज्योतसिंग सिद्धू यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर दिली.
१९८८ च्या रोड रेज प्रकरणात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना शिक्षा जाहीर केली होती. गेल्या वर्षी १९ मे रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. पंजाब सरकारने सिद्धू यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज त्यांना त्यांची सुटका झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची शिक्षा १६ मे रोजी पूर्ण होत असली तरी त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांची सुटका झाली आहे.
२७ सप्टेंबर १९८८ रोजी नवज्योतसिंग सिद्धू यांचा पटियाला येथे पार्किंगबाबत गुरनाम सिंग नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. यानंतर सिद्धू यांनी त्या व्यक्तीस मारहाण केली होती. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तब्बल ३४ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल आला आणि त्यामध्ये सिद्धू दोषी ठरले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात त्यांना १० महिन्यांची शिक्षा सुनावली. तेव्हापासून ते पटियाला कारागृहात बंद होते.
हे ही वाचा :