सांगलीच्या शिवारात भरणार ‘पुढारी अ‍ॅग्रीपंढरी’ | पुढारी

सांगलीच्या शिवारात भरणार ‘पुढारी अ‍ॅग्रीपंढरी’

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  शेती आणि शेतकरी ग्लोबल होत असताना जागतिक कृषी तंत्र विकसीत केलेल्या कंपनी आणि शेतकरी यांच्यातील अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून दैनिक पुढारी आपली जबाबदारी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पार पाडत आहे. यंदा प्रदर्शनाचे तिसरे वर्ष असून हे ‘पुढारी अ‍ॅग्रीपंढरी ’प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन 3 ते 7 मार्च दरम्यान जिल्हा कृषी विभाग मैदान, जिल्हाधिकारी कार्यालयामागे, विजयनगर सांगली येथे आयोजित करण्यात येणार आहे. पुढारी माध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येते. ऑर्बिट क्रॉप सायन्सेस हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत.

40 एकरहूनही भव्यदिव्य मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील 30 हून अधिक पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना पहायला मिळणार आहे. भरघोस उत्पादन देणारी विकसीत केलेली सर्व पिके पाहण्यासाठी तयार असणार आहेत. भाजीपाला तसेच फुलवर्गीय पिकांचादेखील यामध्ये समावेश आहे.

200 कंपन्या सांगलीत

प्रदर्शनात 200 हून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये खते, बी-बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय उत्पादने, सोलर पंप, मोटार पंप, ट्रॅक्टर – अवजारे यांची प्रात्यक्षिके, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, धान्य निवडक यंत्रे, अत्याधुनिक पीक अंतर्गत अवजारे, मलचिंग पेपर, शेडनेट, पाईप अशा विविध प्रकारचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत.

प्रात्यक्षिक प्रदर्शनाची पुढारीची परंपरा

फक्त प्रदर्शन घेऊन नाहीतर देश- विदेशातील 30 हून अधिक पिकांसह प्रदर्शन घेऊन पुढारीने कृषी क्षेत्रात नवी क्रांती केली आहे. यामधून शेतकर्‍यांना पिके कोणती घ्यावीत, खते कोणती वापरावीत, बियाणे आणि पिकांच्या जाती कोणत्या, त्याचे उत्पादन कसे जास्त येऊ शकते हे पुढारीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना समजणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शेतकरी वर्गाला प्रदर्शन पाहण्याची उत्सुुकता असणार आहे.

वेगळेपण

या प्रदर्शनामध्ये पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन, कुक्कुटपालन याचेही प्रदर्शन भरवले जाणार आहे. मत्स्यपालनमध्ये पाच प्रकारच्या प्रजाती प्रदर्शनात पाहता येणार आहेत. कुक्कुटपालनमध्ये हॅचरीजपासून ते पोल्ट्री व्यवसायापर्यंत सर्व ती माहिती मिळणार आहे.

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : प्रशांत – 8805007148
बाळासाहेब – 9850556009

Back to top button