सांगली : विट्यात दोन गटात राडा; २ जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक | पुढारी

सांगली : विट्यात दोन गटात राडा; २ जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यात जुन्या वादातून रविवारी रात्री उशिरा तलवार, चाकू, काठ्या, कुऱ्हाडी याचा वापर करून दोन गटांत राडा झाला. यात अमित टकले आणि सत्यम पवार हे दोघे जखमी झाले. याबाबत जखमी सत्यम पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार सोहम माणीक ठोकळे, मयुर आदाटे, रोहित जावीर, सागर अरविंद पवार, राज ऊर्फ रोहन किरण जावीर आणि चिंगळ्या उर्फ प्रशांत विजय गायकवाड (सर्व रा. विटा) या सहा जणांविरोधात विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जुना वासुंबे रस्त्याच्या परिसरातील सत्यम पवार हा आपल्या घरासमोर अमित टकले आणि अन्य काही मित्रांसोबत बोलत बसला होता. त्यावेळी अमित टकले आणि सोहम ठोकळे यांच्यात पूर्वीच्या असलेल्या वादातून सोहम ठोकळे, मयुर आदाटे, रोहित जावीर, सागर पवार, राज जावीर आणि प्रशांत गायकवाड हे सहाजण तिथे मोटारसायकलवरून आले. तिथे आल्या आल्या त्यांच्यातील मयूर आदाटे याने अमीत टकले यास शिवीगाळ केली आणि काही कळायच्या आत हातातला चाकू अमितच्या पोटात खूपसला. यावर सत्यम पवार ते भांडण सोडवण्यासाठी मधे गेला असता राज जावीर याने त्याला तुझा काय संबंध? तू कशाला आमच्या वादात पडतोयस ? तुला पण सोडत नाही असे म्हणून सत्यम पवार च्या अंगावर धावून जात हातातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने सत्यमच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून त्यालाही जखमी केले. त्यानंतर पुन्हा बाचाबाची झाली. यात सोहम, सागर आणि प्रशांत या तिघांनी काठ्यांनी सत्यम पवार आणि अमित टकले यांना मारहाण केली तर रोहित जावीर याने धावत जाऊन सत्यमच्या अंगावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या झालेल्या हाणामारीत अमित टकले हा गंभीर जखमी झाला असून त्याला सांगलीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर याप्रकरणी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास विटा पोलीस ठाण्यामध्ये स्वतः येऊन सत्यम पवार याने सोहम माणीक ठोकळे, मयूर आदाटे, रोहित जावीर, सागर अरविंद पवार, राज ऊर्फ रोहन किरण जावीर आणि चिंगळ्या उर्फ प्रशांत विजय गायकवाड (सर्व रा. विटा) यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यावरून या सहा जणांवर खून करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रांनी हल्ला करणे यानुसार भारतीय दंड संविधान कायदा कलम ३०२, ३०७, ३५२, ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ यासह ५०४ आर्म ॲक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक बी. डी. कोळेकर अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button