विशाल पाटील म्हणाले यापुढे मेेरिटवरच लढू आणि जिंकूही | पुढारी

विशाल पाटील म्हणाले यापुढे मेेरिटवरच लढू आणि जिंकूही

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

आता घरी बसून चालणार नाही. मी काही अनुकंपावरील कार्यकर्ता नाही. यापुढे मेरिटवरच लढून जिंकून दाखवू, अशी घोषणा प्रदेश काँग्रेसचे नूतन उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बुधवारी केली. येथे वसंतदादा पाटील स्मारक परिसरात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पाटील म्हणाले, राजकारणात मला अनुकंपेवर नाही तर मेरिटवर संधी मिळाली आहे. जिल्ह्याचे नेतृत्व मिळावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती; परंतु दिल्लीतून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. आता गटातटाचे राजकारण सोडून कार्यकर्त्यांसाठी लढायचे आहे. यापुढे प्रत्येक निवडणूक मेरिटवरच होईल. तसेच उमेदवारी वाटपही गुणवत्तेवरच होईल.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आठ आमदार आणि राज्यात एकहाती सत्ता येईल, अशी आपल्या पक्षाची ताकद आहे. परंतु आपण कमी पडत आहोत. भाजपमधील काही कार्यकर्त्यांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे दिसून येते. तो काँग्रेसकडे वळविला पाहिजे.

पाटील म्हणाले,जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क मांडण्यात येत होते. माझा गट नाराज आहे, असेही सांगण्यात येत होते. परंतु आमची मागणी होती की एकाच तालुक्याला दोन वेळा जिल्हाध्यक्षपद दिले गेले आहे. ते आता बदलावे. जिल्हाध्यक्ष पुन्हा मोहनराव कदम यांना करायचे असल्यास त्यांना पाठिंबा आहे. परंतु मिरज, तासगाव, वाळवा, जत अशा मोठ्या तालुक्यांनादेखील जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी मागणी होती. ती पक्षाने मान्य केली आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली संधी सर्वांनी मान्य करून एकमताने पक्षाचे काम करणे गरजेचे आहे.

ते म्हणाले, वसंतदादांचा विचार हा पैशांवर नाही ; तर तो तत्वांवर विश्वास ठेवणारा आहे. ते कार्यकर्त्यांमधून दिसून येत आहे. त्यामुळे मिळालेली संधी आपण सार्थ बनवून मेरिटवर यापुढची लढाई लढू.

मेळाव्यात महावीर बस्तवडे, बी.एन.पाटील, गणपतराव सावंत, तुकाराम माळी, डॉ. योगेश गुरव, सुभाष खोत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील, जि. प.सदस्य विशाल चौगुले, उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक करीम मेस्त्री, सुभाष खोत, वहिदा नायकवडी, प्रा. डॉ.सिकंदर जमादार, अण्णासाहेब कोरे, मनोज सरगर, मदिना बारुदवाले, संजय मेंढे, शुभांगी साळुंखे, अमित पाटील, सुनिल आवटी, अय्याज नायकवडी, उदय पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस कमी पडते आहे, काम करावे लागेल

पाटील म्हणाले, भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे दिसून येते. जिल्ह्याला वसंतदादांचा वारसा आहे. परंतु अस्वस्थ कार्यकर्ते काँग्रेसकडे वळविण्यात आपण कमी पडत आहोत. दुसर्‍या पक्षातून बाहेर पडणार्‍या कार्यकर्त्यांना काँग्रेसकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

आमदार, खासदारकीच्या एबी फॉर्मवर सही करू

पाटील म्हणाले, जिल्हाध्यक्ष झालो असता तर जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारीच्या एबी फॉर्मवर सह्या केल्या असत्या. परंतु आता राज्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता आमदार, खासदारांच्या एबी फॉर्मवर सह्या करू आणि वसंतदादा घराण्याचा वारसा पुन्हा राज्यात प्रस्थापित करू.

त्यांना वाटत होते आता भांडण लागते की काय

विशाल पाटील म्हणाले, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्षपदावरुन काही मतमतांतरे व्यक्त झाली. त्यामुळे भाजपवाल्यांना आता यांच्यामध्ये भांडण लागते की काय असे वाटत होते. परंतु आमच्यामध्ये कोणीच नाराज नाही. त्यामुळे भांडणे होण्याचे कारणच नाही. त्यामुळे भाजपवाल्यांना वाटत होते तसे काहीही घडले नाही.

Back to top button