Nashik News | पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले, सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील घटना | पुढारी

Nashik News | पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले, सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील घटना

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- सिन्नर शहरापासून जवळच असलेल्या कुंदेवाडी परिसरात देवनदी वरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. 23 दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

सार्थक काळू जाधव व अमित संजय जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत. ते सिन्नरच्या आंबेडकर नगर मधील रहिवासी आहेत.

अमित व सार्थक हे दोघे मित्रांसह पोहण्यासाठी कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातून नागरिक धावले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली.

दोघांना पाण्याबाहेर काढून उपचारांसाठी हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमित व सार्थक या दोघांनी दहावीची परीक्षा दिलेली होती. ते निकालाच्या प्रतीक्षेत होते.

प्रवीण जाधव, लखन खरताळे, राम जाधव, अमोल जाधव, रोहन भावसार, शरद जाधव, नवनाथ बर्डे, आदि तरुणांनी मदत कार्य केले.

Back to top button