धक्कादायक! उष्माघातामुळे कल्याण-डोंबिवलीत दोघांचा बळी | पुढारी

धक्कादायक! उष्माघातामुळे कल्याण-डोंबिवलीत दोघांचा बळी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती जाणवू लागली आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे वनस्पती आणि प्राणीमात्रांना अग्निदिव्यातून जावे लागत आहे. उष्णतेची लाट सर्वत्र उसळली असतानाच गेल्या दोन दिवसांत कल्याण-डोंबिवलीत उष्माघातामुळे दोन जणांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. तर उत्तरीय तपासणी अहवालावरून या दोघांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार असल्याचे केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

विशेष म्हणजे डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीत राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह इमारतीच्या गच्चीवर आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ एका तरूणाचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला होता. उष्माघाताने हे दोन्ही बळी गेल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

गोग्रासवाडीत राहणाऱ्या शुभांगी खंदारे (वय 55) राहत्या इमारतीच्या गच्चीवर मृतावस्थेत आढळून आल्या. याच इमारतीत राहणाऱ्या तरूण पेडणेकर याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शुभांगी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला आहे.

तर दुसरीकडे कल्याण रेल्वे स्थानकाजवळ वल्लीपीर रस्त्यालगत एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याची ओळख मात्र अद्याप पटली नाही. पोलीस या तरूणाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. उष्माघातामुळे या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. एकीकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तर दुसरीकडे उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या दोघांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Back to top button