नरवण मधील दहीहंडी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक | पुढारी

नरवण मधील दहीहंडी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक

खाडीपट्टा; रघुनाथ भागवत : श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मातील सणांचे जणू पेवच फुटते. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती वगैरे वगैरे. त्यात विशेष करून वाजत गाजत साजरा होत असलेला सण म्हणजे श्रीकृष्ण जयंती होय. हा सण जरी हिंदू धर्मातील बांधवांसाठी असला, तरी आज कित्येक भागामध्ये मुस्लिम समाज या सणामध्ये सामील होऊन सणाची शोभा वाढवित आहेत. खाडीपट्टयातील नरवण गावातील दहीहंडी उत्सवात तेथील हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येऊन ही सणामधील ऐक्याची भावना गेली पाच दशके जतन करीत आहेत.

वास्तविक दहीहंडी या सणाचे फार मोठे महत्त्व आहे; परंतू या सणामागच्या उद्देशाकडे कोणाचे लक्षच जात नाही. हे सण एक कथा म्हणून साजरे करण्याकडेच लोकांचा कल आहे. उंच-उंच हंड्या बांधणे व त्या फोडण्यासाठी 7 ते 9 थर लावणे ही सगळी अवस्था पाहिली, तर ज्या कारणासाठी हा खटाटोप पूर्वजांनी केला त्याच्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही.

खाडीपट्टयातील नरवण येथील दहीहंडी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असून येथील दहीहंडी गेली कित्येक पिढयांपासून आम्ही एकत्र येऊन करित असल्याचे ग्रामपंचायत सरपंच प्रल्हाद शिरशिवकर, ज्येष्ठ नागरिक एकनाथ विचारे, शितल विचारे, मुज्जफर चाफेकर, इरफान चाफेकर, दाऊद चाफेकर, शकील चाफेकर, विनायक नांदविकर, पांडुरंग नांदवीकर, मारवत वाघमारे, गुडया वाघमारे, संकेत पवार, मारुती वाघमारे, अशोक जाधव यांनी सांगितले. हिंदू-मुस्लीम तसेच बौध्द बांधव देखील एकत्र येऊन साजरा होणारा येथील दहीहंडी उत्सव हा खऱ्याअर्थाने येथील तीनही समाजातील एकतेचे प्रतिक बनलेला आहे.

येथील श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सव साजरा करताना रात्री पांडुरंग नांदवीकर यांच्या घरी कृष्ण जन्मकाळ साजरा करून तेथे बाल्याडांन्स नृत्य करून त्यानंतर भजन केले जाते. सकाळी भैरवनाथ मंदिर येथे दहीहंडी बांधली जाते. दुपारी कृष्णाची आरती घेवून गोविंदाला सुरूवात केली जाते. पहिली भैरवनाथ मंदिर येथील हंडी आणि त्यानंतर गावकीची हंडी मारूती मंदिर येथील फोडून एकनाथ विचारे यांच्या अंगणात हिंद-मुस्लीम बांधव एकत्र येवून खूपवेळ नाचतात व खुप आनंद लुटतात. ही प्रथा गोविंदा उत्सव सुरू झालेपासून झालेली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

गावातील नवसाच्या हंड्या फोडल्यानंतर गोविंदा नदीवर विसर्जनासाठी निघतो. त्यावेळी कुंभारआळी, मोहल्ला, आदीवासी तसेच बौध्दवाडी तसेच रोहिदासवाडी येथील सर्व ग्रामस्थ दहीहंडीचा आनंद घेतात. मुस्लीम मोहल्यामध्ये गोविंदा आब्बास चाफेकर, हसैन डोंगरे, अहमद चाफेकर यांच्या अंगणामध्ये देखील गोविंदा नाचत पूढे नागेश्वरी नदीमध्ये वीसर्जन केले जाते. अशी येथील पारंपारीक हदीहंडीची ही प्रथा सुरू आहे.

दरम्यान, हिंदू-मुस्लीम बांधव आपआपला धर्म विसरून मानवता हाच खरा धर्म असल्याचे कृतितून सिध्द करित एकमेकाच्या खांदावर हात टाकून गोविंदा रे गोपाळ म्हणत श्रीकृष्णाच्या जन्मदिनाचे औचित्त साधत गोकूळ अष्टमी उत्साहात साजरी करित आहेत. ही प्रथा नाही तर ही येथील दोन्ही बांधवांतील प्रेमाचे आणि एकतेचे प्रतिक असल्याचे येथील दोन्ही समाजातील नागरिकांनी सांगितले.

Back to top button