रायगडमधील ‘ते’ तीन आमदार ‘वंचित’च्या संपर्कात? कुमुदिनी चव्हाण यांचा गौप्यस्फोट | पुढारी

रायगडमधील ‘ते’ तीन आमदार ‘वंचित’च्या संपर्कात? कुमुदिनी चव्हाण यांचा गौप्यस्फोट

खेड, पुढारी वृत्तसेवा : सुनील तटकरे आणि अनंत गीतेंना मी बलाढ्य मानत नाही, अंदर की बात है तीन MLA मेरे साथ है, असे म्हणत वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी खळबळ उडवली आहे. सोमवारी (दि.२९) खेड तालुक्यातील भरणे या ठिकाणी चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन, रायगड लोकसभा मतदार संघातील तीन विद्यमान आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला. त्यांनी दापोली विधानसभा मतदार संघातील वंचितच्या शाखांमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून, राज्यात अनेक मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी समोर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे करून आव्हान दिले आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी दापोली मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. या दरम्यान त्या म्हणाल्या, वंचित पक्ष सोडला तर महायुती किंवा इंडिया आघाडीमधील कोणत्याच पक्षाला महिलांनी लोकसभेत नेतृत्व करावे असे वाटत नाही. देशाचा विचार केल्यास फारच कमी पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे.

रायगड मतदार संघात मी सूनिल तटकरे आणि अनंत गीते यांना बलाढ्य प्रतिस्पर्धी मानत नाही. कारण गीते हे दीर्घकाळ खासदार राहिले असले तरी ते आता निष्क्रिय असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तर तटकरे यांनी आपल्या मुलांना आमदार केले आहे. त्यांनी नक्की कोणाचा विकास केला हे त्यावरून दिसते. खरे सांगायचे तर मला रायगड मधील बहुजन मराठा व अठरा पगड जातीतील जनतेने उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून कधीच महिला खासदार झालेली नाही. तसेच मराठा समाजाला देखील येथे कधीच प्रतिनिधित्व मिळाले नाही. मी जन्माने महिला आणि मराठा दोन्हीं आहे. “अंदर की बात है तीन विधायक मेरे साथ है ” असे सांगत रायगड लोकसभा मतदार संघातील तीन विद्यमान आमदार यांच्या मला भक्कम पाठिंबा आहे, असा दावा चव्हाण त्यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button