तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात आता कृषीचे पाठ; विद्यार्थ्यांना मिळणार शेतीचे धडे | पुढारी

तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात आता कृषीचे पाठ; विद्यार्थ्यांना मिळणार शेतीचे धडे

रायगड; पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात आता तिसरीच्या वर्गापासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कृषीविषयक धडे शिकवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी हा विषय शालेय अभ्यासक्रमात एकात्मिक पद्धतीने समाविष्ट करण्यात आला असून त्यासाठीची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांत सुरू होण्याची शक्यता आहे.

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागाने स्वीकारला असून अभ्यासाचा आराखडा तयार करण्यासाठी लवकरच तज्ज्ञांची समिती नेमून तो निश्चित करण्यात येणार आहे. कृषी केंद्रित आशयामुळे शेतीचा अभ्यास होणार असून शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व हा व्यवसाय करणाऱ्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण होणार आहे.

शेती विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात कसा करता येईल, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद येथील तज्ज्ञांची संयुक्त समिती गठित करून याविषयी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कृषी हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे. तिसरी ते बारावीच्या
अभ्यासक्रमात कृषी आशयाचा अभ्यासक्रम असेल. या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधांतून शेतीचे महत्त्व, उपयोजन शेती व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव जागृती अशा अनेक पैलूंकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. प्रामुख्याने कृषी केंद्रित आशयाच्या आधारे अध्ययन होऊन विद्यार्थ्यांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.

या विषयांचा असणार समावेश

शिक्षण व्यवसायाभिमुख व्हावे, या दृष्टीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय स्कील्स गुणात्मक आराखड्यानुसार नववी आणि दहावी स्तरावर एकूण १२ विषय सुरू करण्यात आलेले आहेत. यात कृषी सोलनेशियस पीक उत्पादक या विषयाचा समावेश करण्यात आला आहे; तर इयत्ता अकरावी आणि बारावी स्तरावर १२ विषयांपैकी कृषी सूक्ष्म इमिगेशन तंत्रज्ञ या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत अकरावी-बारावीच्या किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमात ग्रिकल्चर ग्रुपमध्ये हॉल्टिकल्चर, क्रॉप सायन्स, द्विलक्षी अभ्यासक्रमात निमल सायन्स आणि डेअरी तसेच पीक सायन्स आणि हॉल्टिकल्चर या विषयांचा समावेश आहे.

उपसमितीनेही दिला मसुदा

शालेय अभ्यासक्रमातील कृषीविषयक अभ्यासक्रमाच्या विषयासाठी मुख्य समितीला साह्य व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील १२ प्राध्यापकांची उपसमिती नियुक्त करण्यात आली होती. या उपसमितीमार्फत शालेय अभ्यासक्रमात शेती विषयासंदर्भात समाविष्ट करावयाच्या घटक व उपघटकांवर इयत्तावार सखोल चर्चा करून दोन प्रकारचे मसुदे तयार करण्यात आले आहेत.

कृषी विभाग साहित्य पुरविणार

शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळणार आहे. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नक्वी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी जे साहित्य आणि मदत लागेल, ते पुरविण्याची कृषी विभागाची भूमिका असणार आहे.

Back to top button