रायगड : पोलादपूर येथील शिवस्मारकाला उदयनराजे भोसले यांचे अभिवादन | पुढारी

रायगड : पोलादपूर येथील शिवस्मारकाला उदयनराजे भोसले यांचे अभिवादन

पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात ३ डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर आक्रोश मेळावा आयोजित केला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ३ डिसेंबर रोजी आक्रोश मेळावा घेणार आहेत. निर्धार शिवसन्मानाचा…आक्रोश मेळावा यानिमित्त खा. उदयनराजे भोसले यांनी पोलादपूर येथील शिवस्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी श्री महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप साबळे, सुनील भोसले, निवास शेठ, नामदेव शिंदे, दीपक उतेकर, राजेश महाडिक, भाजप तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, शहराध्यक्ष राजा दीक्षित, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस महेश निकम आदीसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महामार्गावर शालेय विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरिता स्काय वॉक उभारण्यासाठी पोलादपूर येथील विद्यार्थी, पालक संघातर्फे खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button