ऐकावे ते नवलच! उरुळी कांचनला ठरला एक, झाला दुसराच सरपंच! | पुढारी

ऐकावे ते नवलच! उरुळी कांचनला ठरला एक, झाला दुसराच सरपंच!

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन (ता. हवेली) गावच्या सरपंचपदासाठी घोड्यावर एकाला बसवून सरपंचपदाची माळ दुसर्‍याच्याच गळ्यात घातल्याचा चमत्कारिक प्रकार सरपंचपदाच्या निवडणुकीत घडला असून, या ग्रामपंचायतीच्या कारभार्‍यांनी आश्चर्यकारक पलटी मारल्याने शेवटची सरपंचपदाची संधी मिळणार्‍या सदस्याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. त्यानुसार उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमितबाबा भाऊसाहेब कांचन यांची 9 विरुद्ध 7 मतांनी निवड झाली आहे.

‘ब्रह्मदेव खाली उतरला तरी उरुळी कांचनच्या नेतेमंडळीचा ठावठिकाणा लागणार नाही,’ अशी उरुळी कांचनच्या राजकारणाबाबत एक म्हण आहे, ती म्हण पुन्हा खरी ठरली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कारभार्‍यांनी ठरविलेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा कारभार्‍यांनीच पराभव केल्याचा प्रकार बुधवारी घडला आहे. ‘जे बोलतील ते करतील’ असं काही नाही असा प्रकार बुधवारी (दि.22) उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पुन्हा अधोरेखित झाला आहे. साडेतीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वयंभू पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांनी सरपंच व उपसरपंचपदाची वर्गवारी करून कारभार केला.

परंतु, एका दिवसापूर्वी शब्द दिलेल्या उमेदवाराचा पराभव घडवून आणण्याचा योग घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अमित भाऊसाहेब कांचन यांनी मिलिंद जगताप यांचा 9 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला आहे. 1 मत निवडणुकीत बाद झाले आहे. त्यामुळे उरुळी कांचन सरपंचपदाच्या निवडणुकीची चांगलीच चर्चा गावात रंगली आहे.  एक दिवसापूर्वी शब्द देणारे कारभारी कोणते आणि बदललेले कारभारी कोणते म्हणून चर्चांचा सिलसिला गरम झाला आहे.

हेही वाचा

Back to top button