चिंता नको मोतीबिंदू आणि चष्म्याची | पुढारी

चिंता नको मोतीबिंदू आणि चष्म्याची

डॉ. वर्धमान कांकरिया

मोतीबिंदू आणि चष्म्यापासून एकाच वेळी मुक्ती मिळवणे शक्य आहे. आपल्या डोळ्यात बुब्बुळाच्या खाली एक नैसर्गिक भिंग (लेन्स) असते. तरुण वयात या भिंगाची आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता चांगली असल्याने जवळचे किंवा दूरचे द़ृष्य आपण स्पष्टपणे पाहू शकतो, पण चाळिशीनंतर भिंगाची ही क्षमता कमी होऊ लागते. साठी जवळ येईपर्यंत ती बरीच कमी झालेली असते. शिवाय वाढत्या वयानुसार हे भिंग अपारदर्शक होऊ लागते. यालाच मोतीबिंदू असे म्हणतात.

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत हे अपारदर्शक भिंग काढून त्या जागी कृत्रिम भिंग बसवले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीला समोरचे दिसू लागते. पूर्वी त्या व्यक्तीला चष्मा असल्यास मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा डोळ्यांचा नंबर तपासून चष्मा वापरावा लागे. आता मात्र मल्टीफोकल लेन्समुळे हा नंबर घालवणेही शक्य झाले आहे; मात्र अशी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या विविध तपासण्या कराव्या लागतात. सफल शस्त्रक्रियेसाठी मोतीबिंदू दुसर्‍या किंवा तिसर्‍या टप्प्यात असायला हवा. त्या व्यक्तीचे बुब्बुळ, नेत्रपटल आणि एकूणच डोळा निरोगी असायला हवा. शिवाय त्या व्यक्तीला मधुमेह असता कामा नये. यासर्व बाबी तपासून शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले जाते.

मोतीबिंदू आणि नंबर एकाच वेळी घालवण्याची शस्त्रक्रिया करताना तीन मुद्दे महत्त्वाचे असतात. पहिला मुद्दा म्हणजे बुब्बुळावर छेद घेताना तो 2 मि.मी.पेक्षाही कमी (मायक्रो इन्सिजन) असायला हवा. कारण हा छेद योग्य प्रकारे घेतला नाही तर डोळ्याचा नंबर बदलू शकतो. डोळ्याचा नंबर न बदलता छेद घेण्याला रिफ्रॅक्टीकली न्यूट्रल शस्त्रक्रिया असे म्हणतात. दुसरा मुद्दा म्हणजे हा छेद घेण्यापूर्वी बुब्बुळाच्या गोलाईचा अभ्यास करावा लागतो. या गोलाईनुसार छेद नेमका कोणत्या ठिकाणी घ्यायचा ते ठरवले जाते आणि तिसरा मुद्दा म्हणजे या शस्त्रक्रियेतील प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे हवी तशी हेणे गरजेचे आहे. म्हणूनच अशी शस्त्रक्रिया करताना नेत्रतज्ज्ञ प्रशिक्षित आणि अनुभवी असून त्याच्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान आणि सुविधा आहेत याची खात्री करून घ्यायला हवी.

डोळ्यातील नैसर्गिक लेन्स (भिंग) काढून त्याठिकाणी बसवण्यात येणार्‍या लेन्सला इंट्रा-ऑक्युलर लेन्स असे म्हणतात. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये तीन प्रकारच्या लेन्सेस वापरता येतात. त्यातील पहिली लेन्स म्हणजे मल्टीफोकल लेन्स. या लेन्सवर रिंग्ज असतात. या रिंग्जमुळे नेत्ररुग्णाला जवळचे आणि दूरचेही दिसू लागते. ही लेन्स चष्म्याच्या प्रोग्रेसिव्ह भिंगाप्रमाणे काम करते. परंतु ही लेन्स वापरताना बुब्बुळामध्ये कोणताही दोष असायला नको. बुब्बुळामध्ये दोष असेल तर टॉरिक मल्टीफोकल लेन्स बसवली जाते. या लेन्समधील टॉरिक कंपाऊंड बुब्बुळातील दोषांचे परिणाम नाहीसे करतो. तिसरी लेन्स म्हणजे अकोमोडेटिव्ह लेन्स. ही लेन्स अत्याधुनिक असून डोळ्यातील नैसर्गिक लेन्सप्रमाणेच असते. तीही आकुंचन – प्रसरण पावू शकते.

ही शस्त्रक्रिया साधारणत: वयाच्या 18 व्या वर्षार्ंनंतर कोणत्याही वयात करता येते. दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करताना तीन पैकी कोणत्याही एकाच प्रकारच्या लेन्सेस वापरणे आवश्यक असते. एका डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांत दुसर्‍या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी म्हणजे दोन्ही डोळ्यांमधील लेन्सेसशी जुळवून घेणे सोपे जाते आणि प्रतिमा अधिक ठळक दिसते. या शस्त्रक्रियेमुळे डोळ्यांचा नंबर 100 टक्के जातो असे नाही. बारीक काम करण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी किंवा वाहन चालवण्यासाठी 0.5 पर्यंतचा चष्मा वापरावा लागू शकतो, पण या शस्त्रक्रियेमुळे त्या व्यक्तीचे परावलंबन नक्कीच कमी होते. या शस्त्रक्रियेसाठी साधारणत: 5 मिनिटांचा कालावधी लागतो. शस्त्रक्रियेनंतर डोळ्याला टाका, पट्टी, भूल द्यावी लागत नाही. या शस्त्रक्रियेनंतर 8 दिवस डोक्यावरून आंघोळ करू नये. तसेच आठ दिवस घराबाहेर किंवा प्रखर सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. असे केल्यास मोतीबिंदू आणि नंबर एकाच वेळी घालवून नेत्ररुग्ण पुन्हा चष्म्याशिवाय जग पाहू शकतो.

Back to top button