‘नीट’चे पेपर सोडवून देणारे रॅकेट गुजरातेत; प्राचार्यासह 5 गजाआड | पुढारी

‘नीट’चे पेपर सोडवून देणारे रॅकेट गुजरातेत; प्राचार्यासह 5 गजाआड

अहमदाबाद; वृत्तसंस्था : वैद्यकीय परीक्षेचा महाघोटाळा म्हणून गाजत असलेल्या ‘नीट’ घोटाळ्याचे रॅकेट गुजरातेत असल्याचे उघड झाले आहे. ‘नीट’ चे पेपर सोडवून देणार्‍या रॅकेटमधील पाच आरोपींना पोलिसांनी शनिवारी अटक केली असून त्यात एका प्राचार्याचा समावेश आहे. या आरोपींनी 27 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये घेतले असल्याचे उघड झाले आहे.

गुजरातेतील पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा शहरातील जलाराम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. नीट-यूजी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्यात विद्यार्थ्यांना गैरमार्गाने मदत केल्याचा आरोप आहे. 2.30 कोटी रुपयांचे धनादेशही पोलिसांनी जप्त केले आहेत. परीक्षा 5 मे रोजी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका रिकाम्याच ठेवण्यास सांगण्यात आले होते. या उत्तरपत्रिका शिक्षकांकडून भरण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या आर्थिक मोबदल्याच्या हिशेबाने यात उत्तरे भरली गेली.

नीट परीक्षेवरून देशभरात वाद सुरू असतानाच झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. बिहारमध्ये एका आरोपीने मला हुबेहूब पेपर परीक्षेपूर्वी मिळाला होता, असा कबुलीजबाब पोलिसांसमोर आधीच दिलेला आहे. याच राज्यात परीक्षेच्या 5 मे या तारखेपूर्वीच परीक्षेची रंगीत तालीम घेण्यात आली होती. यात 35 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यासाठी दिलेले पेपरही नीट परीक्षेतीलच असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या रंगीत तालमीतील पेपर जाळून टाकण्यात आल्याचे; तर काही हाती लागलेले असल्याचे सांगण्यात येते. नीट गोंधळ प्रकरणात बिहारमध्ये 13 जणांना अटकही झालेली आहे. नंतर आता गुजरातेतील शनिवारच्या कारवाईची भर पडली आहे. तुषार भट्ट, रॉय ओव्हरसीज या शैक्षणिक प्रतिष्ठानचा संचालक के. परशुराम रॉय आणि विद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम शर्मा यांचा अटक करण्यात आलेल्या आरोपींत समावेश आहे.

30 विद्यार्थ्यांच्या यादीसह धनादेशांचा पुरावाही सबळ

गोध्रा पोलिस अधीक्षक हिमांशू सोलंकी यांनी सांगितले की, शिक्षणाधिकार्‍यांच्या चौकशीत आरोपी भट्ट याच्या मोबाईल फोनमधून 30 विद्यार्थ्यांची यादी सापडली. भट्टच्या कारमधून सात लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. रॉय ओव्हरसीजचा संचालक परशुराम रॉय याच्याकडून 2.30 कोटी रुपयांचे धनादेशही जप्त करण्यात आले. अनेक धनादेशांवर जलाराम विद्यालयातील ‘नीट’ विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सह्या आहेत.

जळालेल्या प्रश्नपत्रिकांतून उलगडणार पेपरफुटीचे रहस्य

बिहारच्या पाटण्यात नीट परीक्षेआधी पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला होता. तिथे जळालेल्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या आहेत. जळालेल्या प्रश्नपत्रिकांचे तुकडे पोलिसांनी गोळा केले. आर्थिक गुन्हे शाखेने मूळ प्रश्नपत्रिकेशी त्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी हे तुकडे आता पाठविले आहेत. यातून नीटचे पेपर खरेच फुटले होते काय, याचा उलगडा होणार आहे.

Back to top button