पृथ्वीजवळून आज जाणार 845 फुटांचा लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून आज जाणार 845 फुटांचा लघुग्रह

वॉशिंग्टन : पृथ्वीजवळून वेळोवेळी अनेक लघुग्रह जात असतात. अशा लघुग्रहांचा एक पट्टाच मंगळ व गुरू या दोन ग्रहांदरम्यान आहे. आपल्या सौरमालिकेच्या टोकालाही नेपच्यूनच्या पलीकडे असे अनेक लघग्रह आहेत. पृथ्वीजवळून जाणार्‍या एका लघुग्रहाची धडक होऊनच डायनासोरचे साम—ाज्य संपले होते. त्यामुळे अशा लघुग्रहांवर सातत्याने नजर ठेवली जात असते. गुरुवारीही पृथ्वीजवळून एक लघुग्रह जाणार आहे. हा लघुग्रह 845 फूट आकाराचा आहे.

या लघुग्रहाचे नाव ‘2024 जेझेड 6’ असे आहे. एखाद्या स्टेडियमच्या आकाराचा हा लघुग्रह आहे. नासाच्या ‘सीएनईओएस’ डेटानुसार, त्याचा अंतराळातून जलद प्रवास होत आहे. कारण तो पृथ्वीच्या दिशेने ताशी 49,839 कि.मी. या वेगाने प्रवास करतो आहे. गुरुवारी, 23 मे रोजी हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ येण्याची अपेक्षा आहे. नासाच्या जेपीएल (जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी) ने गणना केली आहे की, तो पृथ्वीच्या 3.47 दशलक्ष मैलांच्या आत येईल, जे 1.01 खगोलीय एकक आहे. त्याचा परिभ—मण कालावधी 1.06 वर्षांचा आहे. याचा अर्थ एक सौर कक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो. 845 फूट लघुग्रह पृथ्वीच्या जवळून वेगाने जाण्याची कल्पना आपली चिंता वाढवू शकते; परंतु त्वरित घाबरण्याचे असे काही कारण नाही. नासा या लघुग्रहाच्या प्रक्षेपणाचा काळजीपूर्वक मागोवा घेत आहे आणि त्यांनी पुष्टी केली आहे की, ते पुढे जात असताना पृथ्वीपासून सुरक्षित अंतर ठेवेल. तथापि, मोठ्या आकारामुळे हा लघुग्रह संभाव्य धोकादायक म्हणून चिन्हांकित आहे.

Back to top button