Loksabha election | पुण्याची निवडणूक महाविकास आघाडीच्या हाती: रवींद्र धंगेकर | पुढारी

Loksabha election | पुण्याची निवडणूक महाविकास आघाडीच्या हाती: रवींद्र धंगेकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती आली आहे, असा विश्वास महाविकास आघाडी, इंडिया आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. धंगेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्णपणे सक्रिय झालेली महाविकास आघाडीची यंत्रणा, मित्रपक्षांकडून मिळणारे सहकार्य आणि नागरिकांच्या सर्वच स्तरांतील घटकांतून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लोकसभेची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती आली आहे.

आघाडीने या निवडणुकीत पहिल्यापासूनच उत्तम यंत्रणा कामाला लावली. विधानसभा स्तरावर मी स्वतः केलेले काम आणि नागरिकांच्या प्रश्नावर उठवलेला आवाज याची पावती ठिकठिकाणी लोकांकडून मिळत आहे. भाजपच्या राजवटीला कंटाळलेला मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय मतदारही मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे वळत आहेत. गरीब आणि कष्टकरी जनतेच्या हलाकीत जी भीषण वाढ झाली आहे, त्यामुळे या वर्गात यंदा ‘अच्छे दिन’च्या थापा मारणारे मोदी सरकार अजिबात नको, अशी जनभावना आहे.

भाजपने गेल्या दहा वर्षांत लोकांची फसवणूकच केली. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची महागाई यामुळे मध्यमवर्गीय त्रस्त झाला आहे. मोदी सरकारच्या राजवटीत मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार, इलेक्टोरल बॉण्ड घोटाळा, पीएम केअर फंड घोटाळा, नोटाबंदीच्या काळात झालेले गैरव्यवहार या सगळ्या गैरप्रकारांची पुणेकरांना माहिती आहे. या राजवटीला वैतागलेला पुणेकर स्वयंस्फूर्तीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

Back to top button