कर्नाटक- हमी योजना, महागाई, नेहा हत्या, प्रज्वल कांड | पुढारी

कर्नाटक- हमी योजना, महागाई, नेहा हत्या, प्रज्वल कांड

रवींद्र क्षीरसागर

लोकसभा निवडणुकीच्या कर्नाटकातील पहिल्या टप्प्यात काँग्रेसकडून पंचहमी योजना, केंद्राकडून अनुदानाच्या बाबतीत कर्नाटकावर अन्याय झाल्याचा मुद्दा प्रचारात आणण्यात आला. दुसर्‍या टप्प्यात हमी योजनांसह खा. प्रज्वल लैंगिक छळ प्रकरणाचे मुद्दे गाजले. भाजपने पहिल्या टप्प्यात काँग्रेसने वीज, दूध, मालमत्ता दर वाढवून एका हाताने देऊन दुसर्‍या हाताने काढून घेतल्याचा आरोप केला. दुसर्‍या टप्प्यात केंद्राच्या योजना, नेहा हिरेमठ हत्याकांड, सुरक्षेची गॅरंटी आदी मुद्दे गाजले. कर्नाटकातील निवडणूक 7 मे रोजी संपली. तीत गाजलेल्या मुद्द्यांवर टाकलेला दृष्टिक्षेप.

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीआधी पंचहमी योजनांचे आश्वासन जनतेला दिले होते. सत्तेत आल्यानंतर त्या सर्व योजना जारी करण्यात आल्या. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख महिलेला मासिक दोन हजार रुपये, गृहज्योतीअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज, शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत बस प्रवास, अन्नभाग्यअंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारकांना माणसी पाच किलो तांदूळ वितरण, युवानिधीअंतर्गत बेरोजगार पदवीधरांना मासिक तीन हजार रुपये आणि डिप्लोमाधारकांना मासिक 1500 रुपये भत्ता देण्याची ही योजना आहे. ही पंचहमी योजना पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता.

याबरोबरच केंद्रात सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील मजुरांना दिवसा 400 रुपये मजुरी, शेतकर्‍यांना कायदेशीर हमीभाव, युवकांना लाख रुपये शिष्यवेतन, महिला मजुरांना 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा, महिलांना दरवर्षी एक लाख रुपये अशी आश्वासने देण्यात आली.

अनुदानाच्या बाबतीत केंद्र सरकारकडून कर्नाटकावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला. सर्वांच्या खात्यावर प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन, जमा केलेल्या करामधील रक्कम देण्यास टाळाटाळ, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन, दुष्काळी निधी देण्यात विलंब, राज्यातील सर्व भाजप आणि निजद खासदार कुचकामी ठरल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व बाबतीत केंद्राने कर्नाटकाला केवळ भोपळा दिल्याचे सांगण्यात आले. याबाबतच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या.

दुसर्‍या टप्प्यात हमी योजनांच्या मुद्द्यासह महागाईचा मुद्दा प्रचारात आणला. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भरमसाट वाढ झाली. पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली. स्वयंपाक गॅस सिलिंडर हजार पार गेला. तूरडाळ प्रतिकिलो 200 रुपये झाल्याचे सांगण्यात आले. भाजपने सुरुवातीपासून राम मंदिर, हिंदुत्व, महिला संरक्षण, गेल्या दहा वर्षांत यशस्वी झालेल्या योजना, जागतिक आर्थिक स्तर उंचावल्याचे सांगितले. आठ कोटी लोकांना मोफत वीज, 100 हून अधिक शहरांसाठी वंदे भारत रेल्वेसेवा, मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत असल्याचे सांगितले. दुसर्‍या टप्प्यामध्ये नेहा हिरेमठ हत्या प्रकरण, मागासवर्गीयांच्या यादीत मुस्लिमांना चार टक्के आरक्षण, इतर मागासवर्गीयांना काँग्रेसने नारळाची करवंटी दिल्याचा आरोप केला.

मुस्लिमांना इतर मागास वर्गात आरक्षण देण्याचा मुद्दा आणि नेहा हिरेमठ हत्याकांड दुसर्‍या टप्प्यात गाजले. हमी योजनांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी राखीव ठेवला. मद्य, मालमत्तेसंबंधी विविध कागदपत्रांवरील स्टॅम्प ड्युटी, मालमत्ता कर, वीज दर, दूध दर वाढवले. कृषी सन्मान निधी अंतर्गत वार्षिक चार हजारांची कपात केली. एका हाताने देऊन दुसर्‍या हाताने काढून घेतले. लोकांच्या खिशातील चोरीचा हा प्रकार असल्याचा आरोप भाजपने केला. मुस्लिमांना आरक्षण दिल्याने विश्वकर्मा, इडग, गाणिग, क्षत्रिय, हडपद,-सविता, विणकर, परीट, कुंभार, धनगर, उप्पार, अशा विविध प्रकारच्या समाजांवर याचा परिणाम होणार असल्याचे भाजपने सांगितले.

दुसर्‍या टप्प्यात भाजपने हुबळीतील नेहा हिरेमठ प्रकरणावरून काँग्रेसला कोंडीत पकडले. याची देशव्यापी चर्चा झाली. भाजपने हा मुद्दा प्रचारात वापरला. हा लव्ह जिहादचा प्रकार असून, काँग्रेसने याला खतपाणी घातल्याचा आरोप भाजपने केला. अनुदानात कपात करून केवळ हमी योजनांवर भर देणे, शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करणे, भाग्यलक्ष्मीसह काही योजना बंद पाडल्याचा आरोप भाजपने केला.

दुसर्‍या टप्प्यात दोन्ही पक्ष आक्रमक

नेहा हिरेमठ हत्या प्रकरणावर राष्ट्रव्यापी चर्चा झाली. यामागे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप भाजपने केला. काही दिवसांतच खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करुन तक्रार दाखल झाली. संबंधित पेनड्राईव्हची चर्चा आता राष्ट्र पातळीवर होत आहे. या टप्प्यात काँग्रेस आणि भाजप दोघेही आक्रमक झाल्याचे दिसून आले.

Back to top button