बॅलेट युनिटसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची धावपळ..! | पुढारी

बॅलेट युनिटसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची धावपळ..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिह्यातील बारामती, पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही मतदारसंघात 30 पेक्षा जास्त उमेदवारांची संख्या असल्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर तीन बॅलेट युनिट लागणार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाला अपेक्षा नसली, तरी नियोजनानुसार अतिरिक्त 120 टक्के बॅलेट युनिट अपुरे पडले आहेत. परिणामी निवडणूक अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली असून, पहिल्या, दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक पार पडलेल्या मोठ्या जिह्यांमधून अतिरिक्त असलेले बॅलेट युनिटची जुळवाजुळव करण्यासाठी कसरत सुरू केली आहे.

तिसर्‍या टप्प्यात होणार्‍या बारामती लोकसभा मतदारसंघात 38 उमेदवार असल्याने या मतदारसंघातील मतदान केंद्रांवर तीन बॅलेट युनिट लागणार हे निश्चित झाले होते. परंतु, चौथ्या टप्प्यात असलेल्या पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघाची उमेदवारी अर्ज माघारीची मुदत 29 एप्रिल रोजी सुपष्टात आल्यानंतर या तीनही मतदारसंघात अनुक्रमे 35, 32 आणि 33 असे उमेदवार रिंगणात असल्याने या तीन मतदारसंघातदेखील तीन बॅलेट युनिट लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनानुसार 120 टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट कमी पडत असल्याने जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निवडणूक आयोगाला 4500 हजार बॅलेट युनिटची आवश्यकता लागणार असल्याबाबत पत्र पाठवले.

आयोगाकडून सहमती आल्यानंतर इतर जिह्यात असणारी अतिरिक्त बॅलेट युनिटबाबत चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच जिल्हा निवडणूक विभागाकडे असलेली अतिरिक्त बॅलेट युनिट मावळ मतदारसंघासाठी देऊन त्या यंत्रांचे निवडणूक निरिक्षकांच्या उपस्थितीत सरमिसळ (रँडमायजेशन) करण्यात आले. मात्र पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप यंत्र उपलब्ध नसल्याने जिल्हा निवडणूक विभागाकडून पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात मतदान झालेल्या नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी या मतदारसंघांमध्ये संपर्क साधून अतिरिक्त असलेल्या बॅलेट युनिटबाबत विचारपूस करून मागणी करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यातून बॅलेट युनिट प्राप्त झाले, तरी त्यांची दुरुस्त आहे किंवा बिघाड आहे, याची तपासणी, त्यानंतर मतदारसंघनिहाय वाटप आणि अखेरला सरमिसळ करण्यात येणार असल्याने ‘येरे माझ्या मागल्या’, अशी परिस्थिती अधिकार्‍यांची झाली आहे.

सुटी दिवशीही करावे लागणार काम

1 मे रोजी महाराष्ट्र दिन शासकीय सुट्टीचा दिवस असताना सर्व अधिकारी केवळ बॅलेट युनिटच्या जुळवाजुळवीसाठी कामावर उपस्थित राहणार आहेत. आवश्यक युनिट प्राप्त झाल्यास तातडीने दुरुस्ती, तपासणी करण्यात येणार असल्याने अनेक अधिकारी, कर्मचार्‍यांनी डोक्याला हात लावले आहेत. सुदैवाने एकातरी मतदारसंघात दोन बॅलेट लागतील असे वाटत होते, पण याचा खर्च, नियोजन, व्यवस्थापन आणि सुरक्षा या सर्वांबरोबर संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याचे बोलून दाखवले आहे.

हेही वाचा

Back to top button