दुधाचे दर थंड; शेतकरी हवालदिल : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दरवाढीची मागणी | पुढारी

दुधाचे दर थंड; शेतकरी हवालदिल : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दरवाढीची मागणी

माळेगाव : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे पशुखाद्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, तर दुसरीकडे मात्र दुधाच्या दरात वाढ होत नाही. विशेष म्हणजे नासक्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या ताकाला बाजारात भाव मिळतोय. परंतु, 100 टक्के डिग्री असलेल्या दुधाला मात्र दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने दुधाला वाढवून दर द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

ग्रामीण भागात शेतीचा जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पहिले जाते. दोन पैसे अधिक मिळतील अशी आशा बाळगून बहुतांशी शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. सध्या जनावरांच्या चार्‍याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कडवळ, मका अशा हिरव्या चार्‍याच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. साधारण कडवळ 1 हजार रुपये गुंठा, तर मका 1 हजार 500 रुपये गुंठा अशा किंमतीने हिरवा चारा घेण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

तर गोळीपेंड 1 हजार 400 रुपये, तर भुसा पेंड 1 हजार 200 रुपये दराने खुराकाची बॅग घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये जनावरांचे संगोपन करून दुग्ध व्यवसाय करावा लागत आहे. कंपन्यांकडून दूध विक्री चढ्या दराने केली जाते. मात्र, दूध घालणार्‍या शेतकर्‍यांना दर वाढवून दिला जात नाही, त्यासाठी दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलासराव सस्ते, माणिकराव देवकाते, राजेंद्र जाधव, वसंतराव आटोळे, सोपान देवकाते यांसह शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button