रुळेतील धनगरवस्त्यांमध्ये विस्तारित पाणी योजना : पाणीपुरवठा विभागाची माहिती | पुढारी

रुळेतील धनगरवस्त्यांमध्ये विस्तारित पाणी योजना : पाणीपुरवठा विभागाची माहिती

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : रुळे (ता. राजगड) येथील दुर्गम डोंगरमाथ्यावरील भीषण पाणीटंचाईग्रस्त भोपळीचा वाडा व काळूबाई वाडा धनगरवस्त्यांमध्ये जलजीवन मिशन योजनेची विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्यापासून दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असलेल्या येथील रहिवासी आणि जनावरांना बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलजीवन योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. दैनिक ‘पुढारी’ने गुरुवारच्या (दि. 25) अंकात ‘भीषण पाणीटंचाईमुळे रुळेतील धनगर कुटुंबांचे स्थलांतर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.

त्याची दखल घेत राजगड (वेल्हे) तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी पाणीपुरवठा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शुक्रवारी (दि. 26) रणरणत्या उन्हात पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता चेतन ठाकूर यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांसह काळूबाई वाडा व भोपळीचा वाडा धनगरवस्त्यांमध्ये धाव घेतली. घोटभर पाण्यासाठी येथील रहिवाशांना करावी लागणारी वणवण पाहून अधिकारी हेलावून गेले.

दोन्ही धनगरवस्त्यांत दीडशे लोकसंख्या आहे. गायी, म्हशी, वासरे, बैल, शेळ्या अशी सहाशे जनावरे आहेत. पाणीटंचाईमुळे महिनाभरात निम्म्याहून अधिक रहिवाशांनी कुटुंबासह स्थलांतर केले आहे. याबाबत दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने धाव घेऊन कार्यवाही सुरू केली. सुमन तानाजी मरगळे, दगडू कोंडीबा उघडे, रामभाऊ बाबू ढेबे, बबनराव धोंडिबा कोकरे आदींनी दैनिक ‘पुढारी’चे कौतुक करीत आभार मानले.

सध्या रुळे गावासाठी जलजीवन योजना राबविली जात आहे. काळूबाई वाडा व भोपळीचा वाडा येथील पाणीटंचाईला दूर करण्यासाठी पाणी योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा व इतर बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे. विस्तारित योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार आहे.

– चेतन ठाकूर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, राजगड पं. स.

हेही वाचा

Back to top button