फुप्फुसामध्ये अडकला हळकुंडाचा तुकडा; पुढे काय झालं? | पुढारी

फुप्फुसामध्ये अडकला हळकुंडाचा तुकडा; पुढे काय झालं?

पिंपरी : पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना 85 वर्षीय रुग्णाच्या फुप्फुसामध्ये अडकलेला हळकुंडाचा तुकडा काढण्यात यश आले आहे. शेतकरी असलेल्या 85 वर्षीय व्यक्तीला तीन महिन्यांपासून सतत खोकला सुरू होता. पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांनी फुप्फुसाचा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आणि त्यामध्ये त्यांना रुग्णाच्या फुप्फुसात बाहेरील वस्तू अडकली असल्याचे आढळून आले. श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बरथवाल यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या टीमच्या डॉक्टरांच्या पथकाने रुग्णाची ब्रॉन्कोस्कोपी केली.

फुप्फुसांमध्ये अडकलेल्या वस्तूभोवती पिवळ्या रंगाचे थर तयार झाले होते, ते काढणे कठीण झाले. चिमटा आणि विशेष साधनांचा वापर करून, वैद्यकीय पथकाने अत्यंत गुंतागुंतीच्या प्रयत्नानंतर व इजा न करता फुप्फुसामध्ये अडकलेली वस्तू काढली. ती वस्तू कोणती असेल हे समजण्यास डॉक्टरांना सुरुवातीला वेळ लागला. मात्र, ती वस्तू कापल्यानंतर, त्यांना त्याचा रंग पिवळसर असल्याचे आढळले. रुग्णाशी प्रक्रियेनंतरच्या संवादादरम्यान, त्याने खोकला कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी तोंडात हळकुंडाचा तुकडा ठेवल्याचे सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की हळकुंडाचा तुकडा झोपेच्या वेळी चुकून फुप्फुसात शिरला असावा आणि अनावधानाने त्याच्या श्वसननलिकेत गेला असावा. पूर्णपणे बरे झाल्यावर रुग्णाला घरी सोडण्यात आले.

पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, आम्ही चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी कटिबद्ध असून, सर्व रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी निश्चितच फायदा होईल. आमच्या चांगल्या आरोग्यसेवेमुळे आम्ही आघाडीचे आरोग्य केंद्र म्हणून स्थान मिळविण्याचा प्रयत्न आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील म्हणाल्या, आम्ही सातत्याने रुग्ण केंद्रित आरोग्य सेवा देत असल्याने रुग्णाच्या हितालाच प्राधान्य देतो. त्यामुळे आमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाला सातत्याने आमच्याकडून सेवेसोबत प्रेम, जिव्हाळाही मिळतो.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यतेवर विश्वास असलेल्या आमच्या रुग्णालयात चांगली आरोग्य सेवा देण्याचे बळ आम्हाला नेहमीच मिळत राहिले आहे. रुग्णांची आमच्या रुग्णालयाशी असलेली बांधिलकी हीच लाखो रुग्णांचा आमच्यावर असलेला विश्वास दाखवून देते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा करमरकर, डॉ. एम. एस. बरथवाल यांनीही रुग्णाला दिलासा मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.

हेही वाचा

Back to top button