जलसंकट ! समाविष्ट गावांमध्ये पाण्याची समस्या भीषण : टँकरचा पुरवठा करण्याचे आदेश | पुढारी

जलसंकट ! समाविष्ट गावांमध्ये पाण्याची समस्या भीषण : टँकरचा पुरवठा करण्याचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा तडाखा वाढल्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांसह उपनगरांमध्ये पाणीटंचाई तीव्रता वाढली आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने पालिका आयुक्तांनी पाण्याच्या टँकरची दैनंदिन संख्या 1200 वरून 1400 करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळी तील पाणीसाठा कमी आहे. उन्हाळ्याचे दोन महिने अद्याप बाकी आहेत. या कालावधीत पाण्याची मागणी वाढते. तसेच बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असते. त्यातच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केल्या गेलेल्या 34 गावांतील नागरिकांच्या पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. समाविष्ट गावांत काही ठिकाणी चार, तीन, दोन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सूस, म्हाळुंगे, पिसोळी या गावांना चार दिवसांतून, तर होळकरवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांना तीन दिवसांतून पाणीपुरवठा होतो.

गेल्या वर्षी या गावांत प्रतिदिन 1 हजार 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने ही संख्या प्रतिदिन 1 हजार 235 वर नेली होती. त्यानंतरही पाण्याची समस्या तीव्रच आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेऊन प्रतिदिन 1400 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आराखडा तयार केला जात असून, तो लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

अन्य पर्याय शोधण्याच्या सूचना

नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे हे काम महापालिकेकडून सुरूच आहे. मात्र, त्यासोबतच ग्रामपंचायत असताना गाव असलेली पाणीपुरवठ्याची यंत्रणा सक्षम करणे, तसेच स्थानिक पातळीवर विविध पर्याय शोधण्याच्याही सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्याचे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

पुणेकरांना निकषांपेक्षा जादा पाणी; आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेंचा दावा

शहरातील पाणीपुरवठा असमतोल असला, तरी निकषानुसार दरडोई 152 लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा अपेक्षित असला, तरी प्रत्यक्षात मात्र 270 लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला आहे. पाण्याची गळती आणि इतर कारणांमुळे हे पाणी वाटप असमान असून, समान पाणी वाटप योजनेनंतर निकषानुसार पाणी वाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त म्हणाले, शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारी चारही धरणे शेती तसेच औद्योगिकीकरणाच्या पाण्यासाठीची आहेत. त्यातून शहराला पाणी दिले जाते.

पाटबंधारे विभागाकडून जो कोटा निश्चित करण्यात आलेला, तो शहराची लोकसंख्या तसेच प्रतिव्यक्ती पाण्याचे निकष, गळती, बाष्पीभवन या बाबींवर निश्चित होतो. त्यानुसार शहरासाठी प्रतिव्यक्तीसाठी दिवसाला 152 लिटरप्रमाणे तो मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरात महापालिका घेत असलेले पाणी पाहता हे पाणी प्रतिव्यक्ती 270 लिटर आहे. त्यामुळे मिळणार्‍या पाण्याचे समान वाटप महापालिकेला करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button