दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू; शिरोली खुर्द येथील घटना | पुढारी

दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू; शिरोली खुर्द येथील घटना

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील संपत मोरे यांच्या शेतावर मुक्कामी असलेल्या धनगराच्या वाड्यावरील दीड वर्षांची चिमुरडी बिबट्याने ठार केली. ही घटना गुरुवारी (दि. ११) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. बिबटयाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव संस्कृती संजय कोळेकर असे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शासन व वन विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

याविषयी समजलेली माहिती अशी की, संपत मोरे यांच्या शेतावर संजय कोळेकर या धनगरचा वाडा मुक्कामी होता. रात्री जेवण झाल्यावर सगळे कुटुंब त्याच शेतात झोपले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आईच्या शेजारी गोधडीत झोपी गेलेल्या संस्कृतीला बिबट्याने अलगद उचलून बाजूच्या अर्धा किलोमिटर अंतरावरील उसाच्या शेतात फरफटत नेले व ठार केले. दरम्यान सकाळी एका उसाच्या शेतात त्या चिमुरडीचा बिबट्याने खाल्लेला अर्धवट मूतदेह सापडला.

घटनेची माहिती कळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जाणार आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वन विभाग व शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वन विभाग बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करणार आहे की नाही? बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी कधी करणार? पकडलेले बिबटे अभय अरण्यात का सोडत नाही? वन विभाग किती बालकांचा बळी घेणार? असा सवाल लोक करीत असून वन विभाग जर बिबट्यांचा बंदोबस्त करणार नसेल तर शेतकरी स्वतः कायदा हातात घेऊन बिबटयाचा चोख बंदोबस्त करतील, अशी संतप्त प्रतिक्रिया शिरोली खुर्द येथील शेतकरी वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

Back to top button