रस्ता.. कचरा, राडारोडा अन् दुर्गंधी ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

रस्ता.. कचरा, राडारोडा अन् दुर्गंधी ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

हडपसर/ फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या सासवड रोड रेल्वे स्टेशनजवळील रस्त्यावर कचरा व बांधकामाचा राडारोडा अनेक दिवसांपासून पडून आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. काळेपडळ व फुरसुंगीच्या सीमेवर असणार्‍या सासवड रोड-रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पीएमपी बसथांब्यापासून ‘भोसले व्हिलेज’कडे जाणार्‍या रस्त्यावर परिसरातील नागरिक व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकत आहेत.

अनेक वेळा कचरा पेटविला जात असल्याचेही चित्र दिसून येत आहे. कचर्‍याच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या वावर वाढला असून, ते दुचाकीस्वरांवर धावून जात आहेत. या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या भागातील बांधकाम व्यावसायिक खुलेआम या ठिकाणी रस्त्यावर राडारोडा आणून टाकत आहेत, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही हा कचरा व राडारोडा उचलला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी पडलेला कचरा व राडारोडा तातडी उचलण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

‘भोसले व्हिलेज’कडे जाणार्‍या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कचरा व राडारोडा पडून आहे. मात्र, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. यामुळे हा कचरा तातडीने उचलण्यात यावा.

-विशाल साळुंके, रहिवासी

या ठिकाणी साचलेला कचरा तातडीने उचलून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल. तसेच, कचरा उचलल्यानंतर त्या ठिकाणी साफसफाईदेखील करण्यात येईल.

-विकास मोरे, आरोग्य निरीक्षक, फुरसुंगी

हेही वाचा

Back to top button