एमएचटी सीईटीसाठी तब्बल सव्वासात लाख विद्यार्थ्यांचे अर्ज | पुढारी

एमएचटी सीईटीसाठी तब्बल सव्वासात लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रिकल्चरच्या प्रवेशासाठी होणार्‍या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सव्वासात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदाही इंजिनिअरिंग प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे एमबीए सीईटी राज्यात एक लाख 38 हजार 683 विद्यार्थ्यांनी दिल्याने एमबीएसाठी चांगले महाविद्यालय मिळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ राहणार आहे. दरम्यान, सीईटी सेलकडून घेण्यात येणार्‍या विविध 18 सीईटी परीक्षांसाठी आत्तापर्यंत 12 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, फार्मसी, लॉ, फाइन आर्ट्स अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार अनेक परीक्षांची नोंदणी पूर्ण झाली असून, काही परीक्षाही झाल्या आहेत. त्याचप्रमाणे काही सीईटींच्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाली आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रिकल्चरच्या प्रवेशासाठी होणार्‍या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी 6 लाख 36 हजार 804 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा ही संख्या वाढून 7 लाख 25 हजार 640 झाली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी साधारण 90 हजार विद्यार्थी वाढले आहेत.

एप्रिल महिन्यात येत्या काही दिवसांत पीसीबी गटाची, तर मे महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत पीसीएम गटाची परीक्षा होणार आहे. अशावेळी चांगल्या महाविद्यालयात इंजिनिअरिंग, फार्मसी, अ‍ॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा राहणार आहे. विधी (तीन वर्षे) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणार्‍या सीईटीसाठी 80 हजार 125 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विधी (पाच वर्षे) अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 33 हजार 8 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे बीएड (स्पेशललेक्टिव्ह) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी 72 हजार 378 विद्यार्थ्यांनी दिली, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

एमबीए प्रवेशासाठी चुरस

यंदा एमबीए सीईटीला 1 लाख 38 हजार 683 विद्यार्थी बसले. या परीक्षेला गेल्या वर्षी एक लाख 12 हजार 209 विद्यार्थी बसते होते. त्यामुळे एमबीए प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळेल. एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणार्‍या सीईटीसाठी 38 हजार 479 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. एमबीए आणि एमसीए अशा दोन्ही परीक्षा होऊन काही दिवस झाले आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या निकालाकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे.

यंदा पहिल्यांदाच सीईटी

बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणार्‍या सीईटीसाठी आत्तापर्यंत 11 हजार 890 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी प्रक्रिया 11 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यंदा पहिल्यांदाच ही सीईटी होत आहे.

हेही वाचा

Back to top button