राज्यात पुन्हा अवकाळीचा मारा | पुढारी

राज्यात पुन्हा अवकाळीचा मारा

- विलास कदम, हवामान अभ्यासक

महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यात विचित्र हवामान बदल अनुभवायला मिळत आहे. सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे; पण वातारवणात कमालीचे बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यातही महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर मोठ्या गारा पडल्या आणि त्यामुळे पिके झोपली गेली.

लहरी हवामान आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची पुन्हा कंबर मोडली आहे. मार्च महिन्याबरोबरच एप्रिलमध्येही अवकाळी पाऊस पडल्याने शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात गव्हासारखी पिके अर्धवट पिकलेल्या स्थितीत असताना अवकाळी पाऊस आणि गारांमुळे त्याच्यावर पाणी फेरले गेले. वादळी वारे आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे शेतातील उभे हिरवेगार पीक जमीनदोस्त झाले. त्याचवेळी सध्याचा हंगाम तेलबिया आणि डाळींचा असताना पावसामुळे शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागले. एका अर्थाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. निसर्गाच्या या बदलत्या स्वभावासमोर कोणाचेच चालत नाही. गेल्या काही काळापासून शेतकर्‍यांवर व शेतीवर अनिश्चिततेचे सावट राहत आले आहे. पीक घेण्यापोटी येणारा खर्च पाहता तेवढी वसुलीही होताना दिसत नाही. आजच्या काळात शेतीत त्याला सतत नुकसान सहन करावे लागत आहे. यावर कडी म्हणजे निसर्गाचा प्रकोप पाहता तो आणखीच संकटात ढकलला जात आहे. दोन दिवसांच्या पावसाने झालेली नुकसानभरपाई कोण भरून देणार, हा प्रश्न आहे. त्याची हमी कदाचित कोणीही देणार नाही. अर्थात, अवकाळी पावसाने झालेल्या हानीची भरपाई देण्याची घोषणा अनेक राज्य सरकारांनी केली आहे; मात्र ही भरपाई किती आणि कधी मिळते, ही गोष्ट शेतकर्‍यांना चांगलीच ठाऊक आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍यांना हजारांत पैसे दिले जातात आणि प्रकरण मिटवले जाते. अशा मार्गाने तर शेतकर्‍यांची भरपाई होऊ शकत नाही.

अवकाळी पाऊस गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. पीक आता कापणीला येण्याच्या तयारीत असतानाच या पावसाचा मारा होतो. त्याचवेळी गेल्या काही वर्षांत कमी पाऊस राहत असल्यानेही गव्हाचे उत्पादन कमी राहत आहे; पण यंदा रब्बी पिकांची चांगली लागवड आणि हवामान अनुकूल राहिल्यामुळे गहू आणि तेलबियांचे उत्पादन चांगले राहिले होते; मात्र ऐनवेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाने रब्बी पीक होत्याचे नव्हते झाले.

पाऊस हा वरदान म्हणून समजला जातो; पण तो वेळेवर असेल तर. अवकाळी पावसामुळे शेती आणि शेतकरी दोघांचेही नुकसानच होते. याचे कारण या पावसाने बहुतांश पीक वाया जाते. उर्वरित पिकाला कमी भाव मिळतो. पिकांचे नुकसान होते आणि शेतकर्‍याने केलेला खर्च मातीमोल ठरतो. निसर्गाचा लहरीपणा या गोष्टी शेतकर्‍यांना तापदायक ठरत आहेत. अवकाळी पाऊस सारखा का पडत आहे, असाही प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न शास्त्रज्ञांसाठीदेखील आव्हानात्मक ठरत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, अवकाळी पावसाचा सर्वंकष महागाई दराच्या स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचा प्रभाव केवळ कृषी क्षेत्रापुरताच मर्यादित राहत नाही, तर अर्थव्यवस्थेच्या अन्य घटकांवरही प्रत्यक्ष रूपाने परिणाम होतो. अवकाळी पावसाचे प्रमुख कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग म्हणजेच हवामान बदलच आहे. मानवी व्यवहारही हवामान बदलाला कारणीभूत आहे. जंगलतोड, शहरीकरण, प्रदूषणासारखे मानवी व्यवहार निसर्गाचा समतोल बिघडवण्यास खतपाणी घालत आहेत. बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. त्याचवेळी शहरीकरण आणि प्रदूषण हे संवेदनशील हवामानावर परिणाम करते आणि वातावरण बदलते. त्याचे वेगवेगळे रूप दिसते.

यंदा मार्च महिना सुरू होताच संपूर्ण देशात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे गणित बिघडले. अनेक ठिकाणी तर मोठ्या गारा पडल्या आणि त्यामुळे पिके झोपली गेली. आता पिके पुन्हा उभे राहतील, तोपर्यंत त्याचे दाणे खराब झालेले असतील. प्रामुख्याने या अवकाळी पावसाने मोहरी, भाजीपाला, डाळी, कांदा आदी पिकांचे जादा नुकसान झाले आहे. अर्थातच ही पिके खूपच नाजूक असून, थोडा जरी पाऊस आला तरी ती मान टाकतात. कालच्या पावसातील पिकांची नासाडी पाहून शेतकर्‍यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. त्यांचा आकांत दाखविणारे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सरकारकडून तातडीने अर्थसहाय्य मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्यामुळे तातडीने हालचाली होणे आवश्यक आहे. अशा वेळी त्यांच्याकडे सरकारकडे डोळे लावून बसण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

पिकांच्या संरक्षणासाठी केंद्रीय पातळीवर अनेक योजना आहेत. तरीही काही वेळा नैसर्गिक संकटामुळे झालेल्या हानीला भरपाई मिळतेच असे नाही. पंतप्रधान पीक विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मृदा स्वास्थ्य कार्ड अशा अनेक चांगल्या योजना आहेत; मात्र अल्पभूधारक शेतकर्‍यांना व शेतमजुरांना या योजनांचा लाभ मिळत नाही. 2016 मध्ये सुरू झालेली पीक विमा योजना ही नैसर्गिक संकटात हानी झालेल्या पिकांना विमा संरक्षण देते. यानुसार शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेसाठी शेतकर्‍यांना माफक शुल्क भरावे लागते व उर्वरित रक्कम सरकार भरते. हप्त्याची रक्कम ही पिकाचे स्वरूप आणि शेतकर्‍यांनी निवडलेला विम्याचा प्रकार यावर अवलंबून असते. या योजना सर्व प्रकारचे पीक, तेलबिया शेती व बागायती शेतीला विमा कवच प्रदान करतात; मात्र मध्यम स्तरावरचा शेतकरी हा पिकांना गॅरंटी देत नाही किंवा विमा घेत नाही.

Back to top button