परीक्षा एका दिवसावर, सरकारी शाळांमध्ये प्रश्नपत्रिकांची वानवा ! | पुढारी

परीक्षा एका दिवसावर, सरकारी शाळांमध्ये प्रश्नपत्रिकांची वानवा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणार्‍या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट अर्थात पॅट परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुर्‍या प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. परीक्षा एका दिवसावर आलेली असतानाही शाळांना विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यातच अनेक प्रश्नपत्रिका या दहा ते बारा पानी आहेत. परिणामी, शाळा किंवा शिक्षकांना ऐनवेळी झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे परीक्षा कशी सुरू करायची, असा प्रश्न शाळांच्या मुख्याध्यापकांनी विचारला आहे.

शाळांंमध्ये आज गुरुवार दि. 4 पासून पॅट परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या तीन विषयांची केंद्रीय स्तरावरील प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट अर्थात पॅट परीक्षा 4 ते 6 एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या असून, या प्रश्नपत्रिका जिल्हास्तरावरून प्रत्येक शाळेला वितरित केल्या जात आहेत. परंतु, शाळांनी केलेल्या मागणीनुसार प्रश्नपत्रिका मिळाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातील इयत्ता तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची पॅट परीक्षा घेतली जाणार आहे.

परंतु प्रश्नपत्रिका नसतील, तर परीक्षा कशी घ्यायची, याबाबत शाळा व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळेने गणित विषयाच्या इयत्ता पाचवीच्या प्रत्येकी 55 प्रश्नपत्रिका मागितल्या होत्या. त्यावर केवळ 5 प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. तसेच सहावीच्या 78 प्रश्नपत्रिकांऐवजी 4 आणि सातवीच्या 75 प्रश्नपत्रिका मागवल्या असताना केवळ 5, तर आठवीच्या 100 प्रश्नपत्रिकांची मागणी केलेली असताना केवळ 20 प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. प्रश्नपत्रिका पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. परंतु प्रशासन याबाबत गंभीर नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी केली आहे.

राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन करताना सांख्यिकी माहितीदेखील काटेकोरपणे घेऊन खात्री करणे गरजेचे होते. वितरण व्यवस्थेतदेखील दोष आहे, असे दिसते. आयत्यावेळी प्रश्नपत्रिका कमी पडल्यास झेरॉक्स काढणे आणि इतर कोणताही निर्णय घेणे खूपच अडचणीचे आहे. त्यामुळे परिपूर्ण नियोजन झाल्याशिवाय परीक्षा आयोजितच करू नयेत.

हेही वाचा

Back to top button