पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भटकता आत्मा; काँग्रेसची टीका | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भटकता आत्मा; काँग्रेसची टीका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भटकता आत्मा आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्रात एक भटकता आत्मा आहे, अशी टीका मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली होती. त्याला काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटानेही प्रत्युत्तर दिले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. काँग्रेस मंगळसूत्र व स्त्रीधन हिसकावून घेऊन मुस्लिमांना देणार, अशी त्यांची विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत. सातत्याने खोटे बोलत महाराष्ट्रभर फिरणारे मोदी हेच खरे भटकती आत्मा आहेत. देवेंद्र फडणवीसांनी कोणताही शाप दिला तरी तो लागत नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

गुजरातचे आत्मे महाराष्ट्रात भटकताहेत : संजय राऊत

मराठी माणसाचे शत्रू ज्यांना महाराष्ट्राने या मातीत गाडले, अशा औरंगजेब, अफजल खान यांचे आत्मे गेल्या 400 वर्षांपासून भटकत आहेत. त्यात आता गुजरातचे नवीन आत्मे महाराष्ट्रात येऊन भटकत आहेत. असे अनेक आत्मे महाराष्ट्रात फिरत असले, ते काहीही वक्तव्य करत असले तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली.

महाराष्ट्र भाजपची अवस्था चार जूननंतर स्मशानाप्रमाणे होणार आहे, म्हणून आत्मे भटकत आहेत. ज्यांनी महाराष्ट्र तोडण्याचे षड्यंत्र केले, त्यांचा आत्मा मुंबईतील संपत्तीत अडकला आहे. पण अंधश्रद्धा, ढोंग, फेकाफेकी यांना महाराष्ट्राने कधीही महत्त्व दिलेले नाही, महाराष्ट्रासाठी बलिदान केलेल्या 105 हुतात्म्यांचे आत्मे मोदी यांना शाप देणार आहेत, असे राऊत म्हणाले.

पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार

इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार आहेत. त्यांच्यासारखा एकच अतृप्त आत्मा पंतप्रधानपदी बसला तर देशाची भुताटकी आणि स्मशान होऊन जाईल, असा टोला लगावत आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले आणि उत्तम उदाहरण आहे. लोक स्वीकारतील तो पंतप्रधान बनेल, भाजपसारखा आम्ही पंतप्रधान देशावर लादणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Back to top button