दरोड्याने बिवरी हादरलं; 16 लाखांचा ऐवज लुटला : मारहाणीत महिलेचा कान तुटला | पुढारी

दरोड्याने बिवरी हादरलं; 16 लाखांचा ऐवज लुटला : मारहाणीत महिलेचा कान तुटला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिवरी गावात दरोडेखोरांनी मंगळवारी (दि. 2) पहाटे सशस्त्र दरोडा टाकला. एकाच कुटुंबाच्या सहा ते सात जणांच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करीत रोकड, सोन्याचे दागिने असा तब्बल 16 लाखांचा ऐवज लुटून पळ काढला. दरोडेखोरांनी महिलांना मारहाण करीत गळ्यातील, कानातील दागिने अक्षरश: ओरबाडून घेतले. त्या वेळी महिलेचा कान तुटल्याची माहिती लोणीकंद पोलिसांकडून देण्यात आली आहे.

याप्रकरणी प्रशांत विलास गोते (वय 40, रा. बिवरी, नायगाव) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सात अज्ञात आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ‘गोते हे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. बिवरी गावात ते आई, वडील, पत्नी दोन मुलगे आणि भाचा यांच्यासोबत राहण्यास आहेत. दोन दिवसांत गावाची जत्रा असल्याने गोते यांची बहीण आणि दाजी त्यांच्या घरी राहायला आले होते. तसेच दाजींच्या पायाचे ऑपरेशन असल्याने त्यांनी सोबत तीन लाख रुपये आणले होते. गोते यांना त्यांच्या शेतातील उसाच्या बिलाचे दोन लाख रुपये प्राप्त झाले होते. असे एकूण पाच लाख रुपये रोख रक्कम गोते यांच्या घरातील कपाटात होती.

दरम्यान, सोमवारी रात्री घराचा मुख्य दरवाजा बंद करून सर्व जण झोपले होते. पहाटे दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी कटावणीने दरवाजा उघडला व ते घरात शिरले. आरोपींच्या हातात हत्यारे आणि चाकू होता. आई आणि मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्व जण जागे झाले. तसेच, सर्वच जण हॉलमध्ये आले. तेव्हा तोंडाला मास्क लावलेले सात जण तेथे होते. दरोडेखरांना घरातील महिलांच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत कपाटातील पाच लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी गोते यांच्या आईच्या आणि बहिणीच्या तोंडावर बुक्क्या मारून त्यांच्या गळ्यातील आणि कानातील दागिने हिसकावले.

त्यानंतर गोते यांच्या पत्नी आणि दाजीच्या अंगावरील दागिने काढून घेतले. दरम्यान, त्यांनी गोते यांच्या आईच्या एका कानातील रिंग निघत नसल्याने ती ओरबाडली. त्यात त्यांचा कान तुटला. दरम्यान, जिवे मारण्याची धमकी देत दरोडेखोर शेतातून पळून गेले. त्यानंतर लागलीच गोते यांनी शेजारील लोकांना जागे करून पोलिस पाटलांना घटनेची माहिती दिली. पोलिस उपायुक्त विजय मगर, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक कैलास करे, सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. श्वान पथकासह गुन्हे शाखा आणि इतर पथकांनी दरोडेखोरांचा माग सुरू केला आहे. पण, त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. एका शेतात दागिन्यांचे बॉक्स मिळाले, तर एका बाजूला सीसीटीव्ही होते. परंतु, तेही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा

Back to top button