वणव्यांत लाखोंची वनसंपदा भस्मसात; शेतपिकांसह फळबागाही नष्ट | पुढारी

वणव्यांत लाखोंची वनसंपदा भस्मसात; शेतपिकांसह फळबागाही नष्ट

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरणखोर्‍यातील वरघड, आंबेगाव बुद्रुक, शिरकोली, पोळे परिसरात वणव्यांची मालिका सुरूच असून, दररोज लागणार्‍या वणव्यांमुळे लाखो रुपयांच्या वनसंपदेसह जनावरांचा चारा, शेतकर्‍यांच्या फळबागा आदी भस्मसात होत आहे. मंगळवारी (दि. 26) दुपारी अडीचच्या सुमारास वरघड-आंबेगाव येथील पानशेत धरणतीरावरील डोंगराला लागलेल्या भीषण वणव्यात पन्नास ते साठ एकर क्षेत्रातील वनराई, चारा जळून भस्मसात झाला.

शिरकोली येथे अनेक दिवसांपासून वणव्यांची मालिका सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी शिरकोली वणव्यात कातकरी समाजाची चार घरे भस्मसात झाली होती. तेव्हापासून शिरकोलीत दररोज वणव्यांची मालिका सुरू आहे. शिरकोली येथील पानशेत धरणतीरावर सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या पावसाळ्यात दोन हजार वृक्षांची लागवड केली होती. मात्र, वणव्यात सर्व वनीकरण जळून खाक झाले तसेच शेतकर्‍यांच्या फळबागा, जनावरांचा चाराही नष्ट झाला आहे.

नुकतीच आम्ही वणव्यांच्या नुकसानीची पाहणी केली. बहुतेक वणवे खासगी रानात तसेच पाटबंधारे विभागाच्या जागेत लागले आहेत. वन विभागाचे जंगल डोंगर उतार, माथ्यावर आहेत. तेथे वणव्यांचे प्रमाण कमी आहे.

– वैशाली हाडवळे, वन परिमंडलाधिकारी, पानशेत वन विभाग

वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडे यंत्रणा नाही. वणवे लावून समाजकंटक पसार होत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे दररोज वणवे लागत आहेत.

– अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली

हेही वाचा

Back to top button