जल संकटाच्या हाका ! कुकडी प्रकल्पात 29 टक्के साठा..! | पुढारी

जल संकटाच्या हाका ! कुकडी प्रकल्पात 29 टक्के साठा..!

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : सध्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच मार्चअखेरीस वातावरणातील उष्मा देखील वाढला आहे. त्यातच माणिकडोह धरणामध्ये केवळ 9.77 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने बुधवारी सकाळपर्यंत जुन्नर परिसरातील शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत येणार्‍या सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी 29 फेब्रुवारीपासून सुरू केलेले आवर्तन अद्यापही सुरूच असून, 1200 क्युसेकने माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. कर्जत, करमाळा या ठिकाणी हे पाणी पोहचले असून, सध्या श्रीगोंदा व परिसरात पाणी वाटप होत आहे. यानंतर पारनेर व जुन्नर परिसरातील
शेतकर्‍यांना या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे.

कुकडी प्रकल्पात आजमितीस 8.54 टीएमसी (28.80 टक्के) पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी आजअखेर 12.81 टीएमसी (43.17 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. जुन्नर शहर व परिसराला पिण्याच्या पाण्यासाठी माणिकडोह धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे धरणावर अवलंबून असणार्‍या शेतकरीवर्गात आणि परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाटबंधारे विभागाने जुन्नर शहर व परिसरासाठी आवश्यक पाणी राखीव ठेवावे व माणिकडोह धरणातील विसर्ग थांबवावा.

– धनराज खोत, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर

हेही वाचा

Back to top button