‘यशवंत’च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे   | पुढारी

‘यशवंत’च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे  

लोणी काळभोर/उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सुभाष चंद्रकांत जगताप व उपाध्यक्षपदी मोरेश्वर पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याची नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कारखाना कार्यस्थळावर बुधवारी (दि. 17) निवडणूक झाली.  निवडणूक अधिकारी डॉ. शीतल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीसाठी अध्यक्षपद व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अनुक्रमे सुभाष जगताप व मोरेश्वर काळे या दोघांचे उमेदवारी अर्ज आल्याने पाटील यांनी ’यशवंत’च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप, तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, तब्बल 15 वर्षांनंतर झालेल्या यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर आणि हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 21 पैकी तब्बल 18 जागा जिंकत कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते.

या वेळी माजी सभापती प्रताप गायकवाड, कामगारनेते तात्यासाहेब काळे, कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक संतोष आबासाहेब कांचन, सुनील सुभाष कांचन, सुशांत सुनील दरेकर, शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी, ताराचंद साहेबराव कोलते, योगेश प्रल्हाद काळभोर, मोरेश्वर पांडुरंग काळे, अमोल प्रल्हाद हरपळे, राहुल सुभाष घुले, किशोर शंकर उंद्रे, रामदास सीताराम गायकवाड, सुभाष चंद्रकांत जगताप, हेमा मिलिंद काळभोर, रत्नाबाई माणिक काळभोर, दिलीप नाना शिंदे, मोहन खंडेराव म्हेत्रे, कुंडलिक अर्जुन थोरात, सागर अशोक काळभोर, नवनाथ तुकाराम काकडे, श्यामराव सोपाना कोतवाल आदी उपस्थित होते.

कारखान्यासाठी पोलिस कोठडी  ते अध्यक्षपद, असा प्रवास

आर्थिक अनियमितता व भागभांडवलाअभावी बंद पडलेल्या यशवंत कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर थकीत एफआरपी व ऊसबिलाची रक्कम अदा न झाल्याने गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन वेळेस सुभाष जगताप यांना अटक करून एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई राजकीय सुडापोटी झालेली म्हणून तालुक्यात चर्चेला आली होती. आता त्याच सुभाष जगताप यांच्याकडे अध्यक्षपदाचा बहुमान चालून आल्याने त्यांचा हा राजकीय प्रवास काहींना आठवणीत आला.
हेही वाचा

Back to top button