World Chimney Day : कृत्रिम घरटी देताहेत चिऊताईला आश्रय | पुढारी

World Chimney Day : कृत्रिम घरटी देताहेत चिऊताईला आश्रय

जावेद मुलाणी

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस वाढणारी सिमेंटची जंगले, वाहनांचा कर्णकर्कश्श हॉर्न, शेतीमधील वाढता रसायनाचा वापर, बेसुमार वृक्षतोड व त्यातून होणारे प्रदूषण आदी कारणांमुळे दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. याच चिऊताईचा अधिवास जपण्यासाठी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे सदस्य गेल्या 17 वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. टाकाऊ वस्तूंपासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनवून त्यांचे नागरिकांना वाटप केले जात आहे. आता याच घरट्यांमध्ये चिमण्या आपला संसार फुलवीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे सदस्य देखील पक्ष्यांसाठी परिसरात कृत्रिम घरटी तसेच पिण्यासाठी पाण्याची मातीची भांडी ठेवत आहेत. तसेच दररोज सकाळी व सायंकाळी घराच्या अंगणात धान्य टाकत आहेत. या कृत्रिम घरट्यांमध्ये चिमण्यांनी आश्रय घेऊन आपल्या अनेक पिढ्या वाढविल्या आहेत. त्यामुळे चिमण्यांसह अन्य पक्ष्यांचा किलबिलाट ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही आणि त्याचा मनस्वी आनंदच होत असल्याचे फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे राहुल लोणकर, वैभव जाधव, अर्जुन जाधव, अ‍ॅड. सचिन राऊत, धनंजय राऊत, आशिष हुंबरे, राजू भोंग, अमोल हेमाडे, तेजस गायकवाड, विकास शेंडे, विघ्नेश जगताप यांनी सांगितले. हा प्रयोग गावात यशस्वी झाल्यानंतर फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या वतीने पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, माध्यमिक व महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. चिमण्यांचा अधिवास जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे मत फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबतर्फे सदस्य व्यक्त करीत आहेत.

चिमणी संवर्धन प्रकल्प उभारण्याची मागणी

पूर्वी घरे बांधताना दगडाच्या भिंतीत देवई-कोपरे असायचे, यात चिमण्या आपला गोकूळ फुलवायच्या. अशा जागाच आता नष्ट झाल्या आहेत. शेतामध्ये कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर, अन्नाची झालेली कमतरता, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या झाडांची कमी झालेली संख्या, वाढते प्रदर्शन, मातीचे रस्ते न राहता डांबरी-सिमेंटचे रस्ते यामुळे त्यांना मातीतील अंघोळ (डस्ट बाथ) करण्यासाठी जागेची कमतरता भासू लागली आहे. नैसर्गिक अधिवासात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे चिमण्या आपल्यापासून दूर जात आहेत. नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हल्लीच्या पिढीमध्ये पशू-पक्ष्यांबद्दल आपुलकी निर्माण करणे गरजेचे झाले आहे. यासाठी शासनाने देखील चिमणी संवर्धन प्रकल्प उभारावा, अशा मागणी पुढे येत आहे.

हेही वाचा

Back to top button