कुटुंब कलह : सहानुभूतीची महती!

कुटुंब कलह : सहानुभूतीची महती!
कुटुंब कलह : सहानुभूतीची महती!
Published on
Updated on

कुटुंबामध्ये अनेकवेळा वाद होतात आणि घट्ट प्रेमदेखील आढळते. जेव्हा असे प्रेम आढळते, तेव्हा त्या ठिकाणी एकमेकांबद्दल अतिशय घट्ट अशी सहानुभूती असते. सहानुभूती किंवा एम्पथी ही गोष्ट व्यक्ती मानसिकद़ृष्ट्या निरोगी राहण्यात अत्यंत महत्त्वाची ठरते. जेव्हा दुसर्‍या व्यक्तीच्या भावना आपणाला समजतात, आपण त्यांच्याशी एकरूप होतो आणि त्या वेदना आपणास जाणवतात, तेव्हा आपण घट्ट सहानुभूती व्यक्त करत असतो. जेव्हा अशी सहानुभूती नाहीशी होते, तेव्हा नेमकी उलटी परिस्थिती तयार होते आणि त्यातून हिंसा आणि अत्याचार घडतात.

घट्ट सहानुभूती म्हणजे दुसर्‍याला काय वाटते हे समजणे आणि त्याला मदत करण्याची इच्छा होणे. दुसर्‍याच्या शरीराला कोणत्या वेदना होतात किंवा कोणता सुखद स्पर्श झालेला आहे, ते जाणवणे म्हणजे घट्ट सहानुभूती. बर्‍याच वेळा दुसर्‍याला जे वाटते, त्याचे अनुकरण आपण करतो, तेव्हा ते सहानुभूतीत मोडते. करुणा किंवा कंपॅशन, कळवळा किंवा सिंपथी, दया आणि स्पर्शसंचार किंवा इमोशनल कंटॅज्युअन हे सारे या घट्ट सहानुभूतीत मोडते.

जेव्हा एखादा गुन्हेगार या सर्व गोष्टींना मुकलेला असतो तेव्हा अर्थातच त्याला इतरांबद्दल कोणतीही भावना नसते, असे आपण म्हणतो. काही रोगांमध्येदेखील अशी सहानुभूती ओळखण्याची वानवा असते. उदा., अस्पर्गर्स रोग, ऑटिझम, लेक्सिथायमिया, मेंदूतील रक्तस्राव आणि कपाळाच्या मागील मेंदूला झालेली इजा.

कॉग्निटिव्ह एम्पथी!

दुसरा थोडा जरी अस्वस्थ झाला किंवा काळजीत आहे असे दिसले, तर आपणही अस्वस्थ होणे व काळजी वाटणे या गोष्टी सहानुभूती चांगली असलेल्या व्यक्तीमध्ये दिसून येतात; पण गुन्हेगारी व्यक्तींमध्ये याचा मागमूसही नसतो किंवा असलाच तरी तो तात्पुरता किंवा स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण झालेला असतो. दुसर्‍याचे विचार आणि द़ृष्टिकोन हे आपलेच आहेत, असे वाटणे हेसुद्धा एकप्रकारे घट्ट सहानुभूतीचे लक्षण आहे, ज्याला 'कॉग्निटिव्ह एम्पथी' असे म्हणतात.

सहानुभूतीचा बुद्ध्यांक!

सहानुभूतीचा बुद्ध्यांक हा मोजता येतो आणि असे आढळले आहे की, स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा हा बुद्ध्यांक जास्त आहे. दुसरीकडे, पुरुषांमध्ये पद्धतशीर विचार करण्याचा बुद्ध्यांक हा स्त्रियांपेक्षा जास्त असतो. लहान बाळांमध्ये वयाच्या दुसर्‍या वर्षापासून सहानुभूतीचा उदय होतो. यासंदर्भात एक मजेदार प्रयोग शिकागो विद्यापीठात करण्यात आला होता. काही बाळांना इजा पोहोचवून त्यांच्या मेंदूतील बदल आणि इजा पोहोचवताना बघणार्‍या बाळांच्या मेंदूतील बदल एफ.एम.आर.आय. या मशिनने तपासले तेव्हा असे आढळले की, मेंदूतील जे भाग उद्दीपित झाले, ते दोघांच्याही डोक्यातील समान होते. विशेष म्हणजे, या उद्दीपित भागांबरोबर सामाजिक व नैतिक धारणा निर्माण करणारे मेंदूतील जे भाग असतात तेदेखील याचवेळी सहभागी झाले होते. म्हणजे अनैतिक कृत्ये आणि असामाजिक कृत्ये ही जेव्हा हे भाग सहभागी होत नाहीत तेव्हा घडत असतात.

सहानुभूती आणि गुन्हेगार!

सहानुभूती निर्माण होण्यास मेंदूतील प्रीफ्रंटल कॉटक्स आणि टेम्परोपरायटल जंक्शन हे भाग कारणीभूत असतात. एडीआरए दोन बी नावाचे जनुक हे भावनाशीलता मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्याच जोडीने स्वतःचा आदर आणि सामाजिक कौशल्ये हे निर्माण होण्यास ओएक्सटीआर नावाचे जनुक कारणीभूत ठरते. ज्या लोकांमध्ये सहानुभूती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर असते, त्यांच्या मेंदूत न्यूरल मिरर सिस्टीम ही मोठ्या प्रमाणावर कार्यरत असते. म्हणजे मेंदूत ज्या पेशी असतात, त्या परिस्थितीत घडणार्‍या घटनांची नोंद त्वरित घेऊन त्याचे अनुकरण करण्यात पटाईत असतात आणि म्हणून सहानुभूतीची भावना त्यांच्यात जास्त निर्माण होत असते. गुन्हेगारांमध्ये अशी भावना आढळत नाही. म्हणजे ही सिस्टीम विचित्र पद्धतीने काम करत असते.

अँटी सोशल डिसऑर्डर!

नारसीसिझम किंवा स्वतःच्याच प्रेमात प्रचंड भावनेने असणे, बायपोलर डिसऑर्डर किंवा टोकाचे नैराश्य किंवा टोकाची उन्माद अवस्था निर्माण होणे, काठावरच्या व्यक्तिमत्त्व विकृती, या सर्वांमध्ये सहानुभूतीचा अभाव असतो. सहानुभूती नसते. बर्‍याच वेळा तीव्र नैराश्याने झटक्यामध्ये आत्महत्यादेखील केली जाते. कोणाचेच न ऐकणे, उद्धटपणे वागणे, सर्व नियम धाब्यावर बसवणे याला कंडक्ट डिसऑर्डर असे म्हणतात आणि अशा रुग्णांमध्ये सहानुभूतीचा संपूर्ण अभाव असतो.

सहानुभूतीबरोबरच पश्चात्तापाच्या भावनेचासुद्धा अभाव जर असेल, तर मात्र समाजविघातक विकृती तयार होते आणि गुन्हेगारांची निर्मिती होते. ज्याला 'अँटी सोशल डिसऑर्डर' म्हणतात. अशा व्यक्ती हिंसक आणि रागीट स्वभावाच्या बनतात. ज्यांना इंग्रजीमध्ये सायकोपॅथ असे म्हणतात.

जेव्हा तणावाचे वातावरण निर्माण होते तेव्हा त्याला तोंड देताना असे गुन्हेगार विचित्र पद्धतीने वागतात. जसे की, दुःख झाल्यासारखे वाटते; पण त्याचवेळी भीतीदेखील डोक्यात असते, त्याचवेळी आरडाओरडादेखील चालू असतो! अशा गुन्हेगारांना बर्‍याच वेळा भावना कोणत्या व्यक्त कराव्यात हेदेखील नक्की कळत नसते. गुन्हेगारांच्या मेंदूचे स्कॅन केले असता असे आढळून आले आहे की, सहानुभूती ही त्यांच्यात नैसर्गिकरीत्या निर्माण होत नाही. तर ती स्वतःहून जाणीवपूर्वक निर्माण केली जाते आणि तिचा वापर केला जातो.

कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जर सहानुभूती व्यक्त करणारी नसेल तर निश्चितपणे त्या कुटुंबामध्ये सातत्याने तेढ निर्माण होत असते आणि त्याचे परिणाम कौटुंबिक अस्थिरता यामध्ये होऊन गुन्हे निर्माण होऊ शकतात. सहानुभूती ही भावना आहे आणि त्याला योग्य पर्याय हा रॅशनल कंपॅशन हा आहे. जर कुटुंबामध्ये रॅशनल विचार पद्धती असेल, तर सहानुभूती उपयोगी ठरणारी बनते व ती जास्त समाजोपयोगी बनते! कुटुंबात सहानुभूतीचे महत्त्व म्हणूनच महत्त्वाचे ठरते!!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news