पुण्यात गोळीबार सत्र सुरुच; हॉटेलमध्ये घुसून गोळीबार; एक जखमी | पुढारी

पुण्यात गोळीबार सत्र सुरुच; हॉटेलमध्ये घुसून गोळीबार; एक जखमी

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण येथे एका हॉटेलमध्ये घुसलेल्या तिघांनी गोळीबार केला. ही घटना चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत रासे (ता. खेड) येथील मराठा हॉटेलमध्ये सोमवारी (दि. 18) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. हॉटेलमालक स्वप्निल ऊर्फ सोप्या संजय शिंदे (वय 31, रा. रासे, ता. खेड) हा यामध्ये जखमी झाला आहे. राहुल पवार, अजय गायकवाड आणि अन्य एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांविरोधात चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या या घटनेला महाळुंगे येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्येच्या घटनेची पार्श्वभूमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबारप्रकरणी अजय गायकवाडला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

स्वप्निल शिंदे याचे चाकण-शिक्रापूर रस्त्यावर रासे गावच्या परिसरामध्ये हॉटेल आहे. स्वप्निल हॉटेलमध्ये असताना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलमध्ये दोन राउंड फायर केले. यामध्ये स्वप्निल शिंदेच्या डोक्याला एक गोळी चाटून गेल्याने दुखापत झाली आहे. स्वप्निल शिंदे आणि आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, सर्वजण तडीपारीच्या कारवाईतील आरोपी आहेत. रासे येथील गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी पोलिसांना एक काडतूस मिळून आले. पोलिसांनी तातडीने तपास करीत अजय गायकवाड याला अटक केली आहे, तर अन्य दोघांच्या शोधात पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळीबाराला महाळुंगे येथील हत्येची पार्श्वभूमी

यातील संशयित राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार याचा चार महिन्यांपूर्वी चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे (ता. खेड) येथे निर्घृण खून झाला आहे. त्या खुनातील आरोपींना स्वप्निल ऊर्फ सोप्या शिंदे याने मदत केली असल्याच्या संशयावरून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button