Crime News : धनवे हत्याप्रकरणी एकास आळंदीत अटक | पुढारी

Crime News : धनवे हत्याप्रकरणी एकास आळंदीत अटक

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडमधील सराईत गुन्हेगार अविनाश धनवे याचा इंदापूरमधील एका हॉटेलमध्ये गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. त्या खून प्रकरणात सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एका आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने आळंदी येथून अटक केली आहे. राहुल संदीप चव्हाण असे अटक आरोपीचे नाव आहे. धनवेच्या खुनानंतर चव्हाण पसार झाला होता. तो आळंदी येथे त्याच्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-3 ला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चव्हाणला अटक केली. त्याला इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

इंदापुरातील एका हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे हा शनिवारी (दि. 16) त्याच्या तीन मित्रासह जेवणासाठी थांबला असता त्याचा खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवाजी बाबूराव भेंडेकर (वय 35, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, पुणे), मयूर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय 20, रा. आंबेडकर चौक, पोलिस चौकीसमोर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे), सतीश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय 20, रा. शाळा नं. 4, चर्‍होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे), सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय 22, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड, जि. पुणे) यांना अटक केली होती. सराईत गुन्हेगार अविनाश धनवे याने संघटित गुन्हेगारी टोळी बनवली होती. धनवे आणि त्याच्या प्रतिस्पर्धी टोळ्यांचे सतत दिघी, चर्‍होली, वडमुखवाडी परिसरात वाद होत होते. त्यातूनही काही गुन्हे दाखल झाले होते.

हेही वाचा

Back to top button