‘पवार विरुद्ध पवार’ या आरोप प्रत्यारोपांनी बारामतीकर सुन्न! | पुढारी

'पवार विरुद्ध पवार' या आरोप प्रत्यारोपांनी बारामतीकर सुन्न!

राजेंद्र गलांडे

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील ‘पवार विरुद्ध पवार’ लढतीत कुटुंबातूनच एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडू लागल्याने बारामतीकर सध्यातरी सुन्न अवस्थेत आहेत. यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पवारांच्या घरातीलच या लढतीने बारामतीतही घराघरांत फूट पडल्याचे चित्र पहिल्यांदाच निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्या बाजूने एकतर्फी वातावरण दिसून येत होते. परंतु, मुरब्बी राजकारणी समजल्या जाणार्‍या शरद पवार यांनी हळूहळू त्यात बदल घडवून आणला. प्रत्यक्ष मतदानाला अजून अवकाश असून, या कालावधीत अनेक घडामोडी तालुक्यात घडतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दोन्ही उमेदवारांतील बलाबल विचारात घेतले, तर सध्या अजित पवार यांच्याकडे सर्व सहकारी संस्थांची सूत्रे आहेत. माळेगाव, सोमेश्वर कारखान्यांसह तालुका दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, बारामती बँक अशा बलाढ्य संस्था त्यांच्या हाताशी आहेत. विद्या प्रतिष्ठान, शारदानगर अशी मोठी शैक्षणिक संकुले सोडली तर शरद पवार यांच्या हाती काही नसल्याचे कागदावर दिसते आहे. परंतु, ही कागदावरची आकडेमोड फसवी ठरू शकेल इतपत या गटाकडून आता प्रयत्न सुरू झाले आहेत. वयस्कर व्यक्तीला आधाराची गरज असताना त्यांना सोडल्याबद्दल अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास यांनी डागलेली तोफ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत आयोजित व्यापारी मेळावा ऐनवेळी रद्द झाला. त्याचीही उलटसुलट चर्चा शहरात झाली. खा. सुळे यांच्या बाजूने श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, सई पवार हे प्रचारात उतरले आहेत. अजित पवार यांच्याकडून त्यांचे पुत्र जय पवार अ‍ॅक्टिव्ह आहेत. परंतु, थोरले पुत्र पार्थ अद्याप बारामतीच्या मैदानात उतरलेले नाहीत.

हेही वाचा

Back to top button