Loksabha election : बारामतीत प्रस्थापितांना नकोत प्रस्थापित अजित पवार | पुढारी

Loksabha election : बारामतीत प्रस्थापितांना नकोत प्रस्थापित अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील प्रस्थापित नेत्यांनी अजित पवार यांचा जाच सहन केलेला असल्याने आता त्यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याची संधी आल्याने हे सर्वच नेते कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत या सर्वांनी मदत करावी, यासाठी अजित पवार यांना फार नाकदुर्‍या काढाव्या लागणार आहेत. भाजपने कितीही एकसंधतेचा नारा दिला, तरी हे नेते अजित पवार यांचे काम मनापासून करतील का? याबाबत शंका व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या त्रासातूनच पुरंदर- हवेलीत विजय शिवतारे यांचे बंड समोर आले आहे, तर इंदापूरला हर्षवर्धन पाटील अजूनही कार्यरत झालेले नाहीत. उलट ते विधानसभेसाठी संकल्प मेळावे घेण्यात मग्न आहेत. महायुतीची समन्वय बैठक चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत घेतली. त्या बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवली आहे. अशीच भावना महायुतीत भाजपसह इतर पक्षांच्या अनेक नेत्यांची आहे. भाजपचे काही नेते ती उघडपणे व्यक्त करत नाहीत. अजित पवार यांना पराभूत करण्याची आलेली नामी संधी सोडायची नाही, असा निर्धारच या नेत्यांनी केल्याचे दिसत आहे. वरून हे नेते काहीही म्हणत असले, तरी आतून ते अजित पवार यांच्या पराभवासाठी आतुर झाल्याचे चित्र आहे म्हणूनच अद्यापही महायुतीच्या बारामती मतदारसंघातील प्रचाराने फार वेग घेतल्याचे चित्र दिसत नाही.

लोकसभेचा अजित पवार यांचा विजय महायुतीच्या अनेक नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीतील अडथळा ठरणार असल्याने हे नेते आता ‘अभी नहीं तो कभी नहीं’च्या पवित्र्यात आहेत. भाजपवाले तराजू घेऊन फिरतात आणि कोणते हलके, कोणते वजनदार,
याचा हिशेब करून मग आपले गणित ठरवतात. त्यामुळे या वेळी बारामतीत शरद पवार यांचा पराभव करण्याच्या निश्चयाने आम्ही कामाला लागलोय, अशा अर्थाचे वाक्य चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या समन्वय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. पण, बारामती मतदारसंघातीलच प्रस्थापित नेत्यांची भूमिका नेमकी याच्याविरोधात आहे. या नेत्यांना आगामी वाटचालीत शरद पवार यांच्यापेक्षा मोठा अडसर अजित पवार वाटतात. कारण, या सर्वांनी अजित पवार यांचा त्रास सहन केलेला आहे. अजित पवार यांचा पराभव त्यांच्या पथ्यावर पडणारा आहे.

छुप्या पद्धतीने नेते लागलेत कामाला

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीतील काही मोजक्या नेत्यांनाही आता अजित पवारच डोईजड झालेले आहेत. त्यामुळे शक्यतो अजित पवारांचा पराभव झाला, तर बरे, अशी त्यांची मानसिकता असून, या पराभवासाठी हातभार लावण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे. शिवतारे यांनी ती उघड बोलून दाखवली, तर इतर नेते छुप्या पद्धतीने कामाला लागले आहेत. यामध्ये या दोन्ही पक्षांतील अजित पवार यांचे अतिशय कट्टर समर्थक असलेले नेते वगळता विधानसभा इच्छुकांचा सहभाग मोठा असेल, असे दिसते.

हेही वाचा

Back to top button