रानडुकराचा तीन तास धुमाकूळ; चौघे जखमी, वाहनांचेही नुकसान | पुढारी

रानडुकराचा तीन तास धुमाकूळ; चौघे जखमी, वाहनांचेही नुकसान

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : येरवडा येथील मदर तेरेसा नगर येथील गाडीतळ परिसरात सोमवारी सकाळी तीन तास रानडुकराने धुमाकूळ घातला. त्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. तसेच धडक दिल्याने काही वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या उपद्रवी रानडुकराला शिकलकर समाजातील युवकांनी पकडून कात्रज घाटात सोडून दिल्याचे सांगण्यात आले.

परिसरातील जंगलातून पहाटे 4 वाजता अचानक मदर तेरेसा नगरमधील गाडीतळ येथे रानडुक्कर आले. रस्त्यात येणार्‍या वाहनांना धडक देत त्याने या भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. दाट लोकवस्तीत हे रानडुक्कर घुसल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. हे रानडुक्कर सैरभैर धावत होते. रस्त्यावर दिसणार्‍या वाहनांना ते धडक देत होते. त्याने चावा घेतल्याने परिसरातील चार नागरिक जखमी झाले आहेत. स्थानिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांनी शिकलकर समाजातील काही युवकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर या युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या रानडुकराला पकडले.

रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यातील एकास ससून रुग्णलयात पाठविण्यात आले आहे. हे रानडुक्कर जवळपास 50 किलो वजनाचे असून, त्याचे अंदाज वय 2 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. त्याला कात्रज घाटातील वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात आल्याचे शिकलकर समाजातील युवकांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button