संतापजनक..! खुनापूर्वी मुलावर लैंगिक अत्याचार | पुढारी

संतापजनक..! खुनापूर्वी मुलावर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घराजवळ सायकल खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर मुलाचा मृतदेह निर्जन स्थळी फेकून दिला. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी वाकड येथे उघडकीस आली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलाचा खून करण्यापूर्वी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नराधम तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. पवन जागेश्वरप्रसाद पांडे (28, रा. नागर, माणिकपूर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे राहणार्‍या आठ वर्षीय मुलाचे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते आठच्या सुमारास घराजवळून अपहरण झाल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलाचा शोध सुरू केला.

उसाचा रस देऊन जमवली गट्टी

आरोपी पवन हा मूळचा उत्तर प्रदेशमधील असून तो दीड महिन्यापूर्वी कामाच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. बावधन येथे राहून तो वाकडमधील एका रसवंतीगृहामध्ये काम करत होता. मुलगा शाळेत जात नव्हता. त्याच्या घराजवळ असलेल्या रसवंतीमध्ये आरोपी पवन हा मागील तीन दिवसांपासून कामाला लागला होता. पवन दररोज मुलाला उसाचा रस पाजत होता. त्यामुळे त्या दोघांची चांगली गट्टी जमली होती.

दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पवन याने मुलाला वडापाव खायला देण्याचे आमिष दाखवून बावधन येथे नेले. पाषाण तलावाजवळ नेऊन तिथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. घडलेला प्रकार मुलगा सर्वांना सांगेल, या भीतीने पवन याने मुलाला मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलाचा मृतदेह झुडपांमध्ये फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

अंतर्गत जखमा

मुलाला अंतर्गत जखमा झाल्या. मारहाणीत मुलाचा मेंदू, फुफ्फुस आणि पोटातील इतर अवयवांना मोठी हानी पोहोचली असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा

Back to top button