दुकानांवरील मराठी फलकांबाबत कारवाई नाहीच | पुढारी

दुकानांवरील मराठी फलकांबाबत कारवाई नाहीच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील दुकाने आणि विविध आस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये करण्याचे लेखी आदेश महापालिकेने काढल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत याबाबत काहीच कारवाई झालेली नाही. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई कुणी करायची, याची स्पष्टता नसल्याने पुढे काहीच झाले नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व दुकानांवरील पाट्या दोन महिन्यांत मराठी भाषेत कराव्यात, असे आदेश दिले होते. त्याची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली. मुंबई महापालिकेने पाट्या मराठीमध्ये करण्याचे आदेश दिल्याचा दाखला देत मनसेने पुण्यातील दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांकडे केली होती.

तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी कडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने न्यायालयाचा आदेश व इतर महापालिकांची माहिती घेऊन पुण्यातील पाट्या मराठीमध्ये करण्याचे आदेश काढले. यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांना आदेश देण्यात आले असून अंमलबजावणी न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. पाट्यांसाठी दिली जाणारी 4 बाय 3 फुटांची जागा वाढवून द्यावी, तसेच परदेशी कंपन्यांच्या ब्रँन्डची नावे इंग्रजीत लिहिण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. मात्र, आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर महापालिकेने कारवाई करायची की, कामगार आयुक्तांनी याबाबत स्पष्टता नसल्याने आदेशानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. शिवाय व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भातही कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा

Back to top button