रिद्धपुरात १ जूनपासून मराठी भाषा विद्यापीठाचा श्रीगणेशा

रिद्धपुरात १ जूनपासून मराठी भाषा विद्यापीठाचा श्रीगणेशा
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर :  कित्येक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. मराठीचे आद्यकर्ते संत आणि समतेचा विचार सर्वप्रथम तेराव्या शतकात मांडणारे श्री गोविंदप्रभू यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या मराठी वाङ्मयाची काशी श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे 600 वर्षांनंतर अखेर 1 जूनपासून मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथाचीच नव्हे तर मराठी वाङ्मयाची काशी समजली जाते. रिद्धपूरमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ 'लीळाचरित्र' लिहिला गेला. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, द़ृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्ती प्रकारासारखे ग्रंथ जन्माला आले. हिंदी भाषेचा विकास व्हावा यासाठी वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची निर्मिती झाली आहे. रामटेक येथे संस्कृत भाषेचे कवी कुलगुरू कालिदास यांच्या नावाने स्वतंत्र विद्यापीठ आहे. राज्य सरकारच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गेल्यावर्षी रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी दै. 'पुढारी'ला मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषा विद्यापीठ सुरू होत असल्याची आनंदवार्ता दिली.

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेची कार्यवाही लवकर करावी, यासाठी विविध साहित्य संघटनांनी मागणी लावून धरली होती. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना शिफारसींचा अहवाल सादर केला होता. त्यामधील शिफारसी सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानुसार जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू होत आहे. मराठी भाषा प्रत्येकाच्या जगण्याशी निगडित असून प्रत्येक क्षेत्राशी संबंध येतो. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम व अभ्यासक्रम शिकवले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मराठी भाषा संवर्धनासाठीचा अभ्यास केला जाणार आहे. भविष्यात मातृभाषेतून उच्चशिक्षण देण्याबाबतचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मराठीच्या सर्व बोली भाषांच्या संवर्धनासाठीच्या उपाययोजनाबाबतचा अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, कला, साहित्य, संस्कृती याची माहिती देणारा 'महाराष्ट्रालॉजी' अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवला जाणार आहे.

अमरावतीमधील रिद्धपूरच का…

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे प्रमुख केंद्र आहे. ही माती श्री गोविंदप्रभू, श्री चक्रधरस्वामी, श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेली आहे. म्हाईंभर भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला याच मातीतून नवा अंकुर फुटला. श्री गोविंदप्रभू महाराष्ट्राचे आद्यकर्ते संत सुधारक होते. ते चक्रधर स्वामींचे गुरू होते. श्री चक्रधर स्वामी यांनी रिद्धपूर येथे मठाची स्थापना केली. श्री चक्रधर स्वामी यांनी रिद्धपुरातच वाङ्मयीन, आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक क्रांती केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न याच भूमीत झाला.

इंग्रजीला टक्कर देण्यासाठी मराठी सक्षम

राज्य सरकारने मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठीचा अहवाल तयार करण्यास खूप कमी वेळ दिला. कमी वेळेत देखील विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारसी मान्य केल्या आहेत. 1 जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ अस्तित्वात येईल. इंग्रजीसह इतर भाषांना टक्कर देण्यासाठी मराठी राजभाषा सक्षम होणार आहे.
– डॉ. सदानंद मोरे,
अध्यक्ष, मराठी भाषा विद्यापीठ स्थापना समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news