पाकिस्तानचे पाणी तोडले | पुढारी

पाकिस्तानचे पाणी तोडले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या सीमेवरील शाहपूर कंदी धरणाचे काम पूर्ण झाल्याने आता पाकिस्तानला विनासायास आणि फुकटात मिळणारे रावी नदीचे पाणी बंद झाले आहे. या बंधार्‍याचा फायदा जम्मूनजीकच्या कठुआ आणि सांबा जिल्ह्यांच्या शेतकर्‍यांना होणार आहे.

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात 1995 मध्ये या बंधार्‍याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. पण पाणी वाटपावरून जम्मू-काश्मीर व पंजाब यांच्यातील संघर्षामुळे हा प्रकल्प रखडत गेला. परिणामी जुन्या लखनपूर धरणातून सोडावे लागणारे पाणी अगदी फुकट पाकिस्तानला मिळायचे व त्यांच्या भागातील सिंचन सुधारत होते. सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प पूर्ण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले आणि 2018 मध्ये जम्मू-काश्मीर व पंजाब या दोन राज्यांत सहमती घडवली गेली व नंतर कामाला प्रारंभ झाला. अशा तर्‍हेने काम सुरू झालेले हे धरण आता पूर्ण झाले असून आता त्यातून एक थेंब पाणीही पाकिस्तानला फुकटात मिळणे बंद झाले आहे.

32 हजार हेक्टरला फायदा

शाहपूर कंदी धरण पूर्ण झाल्याने रावी नदीचा प्रत्येक थेंब वाचवला गेला आहेच. पण कठुआ आणि सांबा जिल्ह्यांना या वाचवलेल्या 1150 क्युसेक पाण्याचा पुरेपूर वापर करता येणार आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांत 32 हजार हेक्टरची जमीन सिंचनाखाली येणार आहे.

सिंधू पाणी करार

1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सिंधू पाणीवाटप करार झाला. त्यानुसार भारताकडे रावी, सतलज आणि बिआस या नद्यांच्या पाण्यावर पूर्ण हक्क आहे तर पाकिस्तानकडे सिंधू, झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्यावर हक्क आहे. शाहपूर कंदी धरण नसल्याने रावी नदीतील अतिरिक्त पाणी थेट पाकिस्तानात जायचे. पण त्यामुळे जम्मू परिसरातील शेतकरी वंचित राहिला.

Back to top button