सांगली : दुचाकी-कारच्या अपघातात शिराळ्यातील तरुणाचा मृत्यू | पुढारी

सांगली : दुचाकी-कारच्या अपघातात शिराळ्यातील तरुणाचा मृत्यू

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : किणी टोलनाक्याजवळ तरूणाच्या दुचाकीला कारने धडक दिली. त्यानंतर कारच्या आरशात सॅक अडकून दुचाकीवरून पडल्याने विकर्ण नंदकुमार मस्कर (वय 24, रा. शिराळा) याचा मृत्यू झाला. हा अपघात किणी (ता. हातकणंगले) टोलनाक्याजवळ सोमवारी दुपारी घडला.

विकर्ण हा वन विभागाची शारीरिक चाचणी परीक्षा देऊन गावी घराकडे चालला होता. खडतर स्थितीतून मार्ग काढत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होत आले असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या मृत्यूने शिराळा परिसरात शोककळा पसरली.

सकाळी विकर्ण याची कोल्हापूर येथे शारीरिक चाचणी परीक्षा होती. शिराळा येथून तो सकाळी दुचाकीने (एमएच 10 सीई 6657) कोल्हापूरला गेला होता. परीक्षा देऊन दुचाकीवरून तो घराकडे जात होता. किणी टोलनाक्याजवळ तो आला असता, पुण्याकडे निघालेल्या कारने (एमएच13ईसी 3063) त्याच्या दुचाकीला धक्का दिला. त्याची सॅक कारच्या आरशात अडकली. त्यामुळे तो महामार्गावर कोसळला. त्याचे डोके रस्त्यावर जोराने आपटले. डोक्याला गंभीर मार लागला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. उपस्थितांनी त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

हेल्मेट असते तर…

हेल्मेट सक्तीबाबत पोलिस व महामार्ग प्रशासनाकडून वारंवार प्रबोधन केले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत अनेकजण धोकादायक प्रवास करतात. विकर्ण याने जर हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्याचा जीव वाचलाही असता.

क्षणात होत्याचे नव्हते…

विकर्ण यास वडील नाहीत. त्याने परिस्थितीवर मात करत बी.एस्सी. पदवी संपादन केली. मोठ्या चार बहिणी. त्यातील एक शिक्षिका, तर एक पोलिस उपनिरीक्षक बनली. त्याने बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवत स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याच्या जिद्दीने अभ्यास केला. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या वनरक्षक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. भावाच्या या यशाने चार बहिणींसह आईलाही अत्यानंद झाला. मात्र, त्याच्या मृत्यूने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Back to top button