Loksabha Election : शिरूरमधील महायुतीचा उमेदवार गुलदस्तात! | पुढारी

Loksabha Election : शिरूरमधील महायुतीचा उमेदवार गुलदस्तात!

संतोष वळसे पाटील

मंचर : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाली असून, त्यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमधील भाजपकडून महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पूर्वा वळसे पाटील, विलास लांडे, तर शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नावे चर्चेत आहेत. महायुतीचा उमेदवार कोण, हे नाव गुलदस्तातच असल्याने मतदारांमध्ये सस्पेन्स वाढला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच प्रतिष्ठेचा मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघावर सलग तीन वेळा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून आले होते. परंतु, सन 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. सध्या राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची सत्ता असून शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने दावा केला आहे.

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखवले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस साजरा झाला, त्यावेळी भोसरीमध्ये भावी खासदार म्हणून त्यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यांनी याअगोदर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. माजी आमदार असल्याने त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. तसेच ते अजित पवार यांच्या जवळील असल्याने त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राज्य सरकारमधील विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा होत आहे.

पूर्वा वळसे पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय अधिक सुकर होऊ शकतो, असे बोलले जाते. वळसे पाटील हे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असून पूर्वा वळसे पाटील याही गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. वळसे पाटील राज्यात दौर्‍यावर असल्यानंतर आंबेगाव तालुक्यातील अनेक कार्यक्रमांना पूर्वा वळसे पाटील या आवर्जून उपस्थित असतात. उच्चशिक्षित, महिला आणि तरुणींचे संघटन, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. राजकारणात नवीन चेहर्‍याला संधी मिळावी म्हणून यासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, तसेच त्यांना संधी मिळाल्यास जुन्नरचे आमदार अतुल बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते, भोसरीचे आमदार महेश लांडगे, हडपसरचे आमदार चेतन तुपे हे सर्व एकत्र येऊन काम करणार आहेत.

माजी खासदार शिवाजीराव पाटील यांची तयारी पूर्ण

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील खासदार नसतानाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदासंघात विकासकामांसाठी निधी आणला. शिवसेना फुटल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याने त्यांच्यावर टीका झाली. मात्र त्यांनी पुन्हा जनतेत जाऊन जनसंपर्क वाढवून पुन्हा एकदा जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कामाचा झपाटा पाहता त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्या वेळी त्यांना हे पद शिरूरच्या उमेदवारीपासून लांब ठेवण्यासाठी देण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकी लढवण्यासाठी ते इच्छुक असून त्यांनी कार्यकर्ते, प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. मतदारसंघातील गावोगावी फिरत ते जनसंपर्क वाढवत आहेत.

हेही वाचा

Back to top button