‘शिवछत्रपती’ पुरस्कार पुन्हा रखडला : पुरस्काराचा वाद एमओएच्या कोर्टात | पुढारी

‘शिवछत्रपती’ पुरस्कार पुन्हा रखडला : पुरस्काराचा वाद एमओएच्या कोर्टात

सुनील जगताप

पुणे : राज्य शासन आणि क्रीडा विभागाच्या वतीने खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा संघटकांना दिला जाणारा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार पुन्हा एकदा रखडला आहे. आगामी काही दिवसांत हे पुरस्कार जाहीर होतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’ला दिली. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ जाहीर केले जातात. गेल्या वर्षी हा पुरस्कार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात आला. परंतु, शिवजयंती होऊनही अद्यापही शासनाकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. पुरस्कार निवड समिती आणि क्रीडा अधिकारी यांच्यात एकमत होऊ न शकल्याने राज्य क्रीडा पुरस्कारांचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. निवड समितीने अन्यायग्रस्त खेळाडूंना पुरस्कार देण्याबाबत अनुकूलता दर्शविलेली आहे. मात्र, क्रीडा खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हा मुहूर्त हुकला आहे.

समितीच अंतिम निर्णय घेईल

दरम्यान, शिवछत्रपती पुरस्काराच्या वादाबाबत ऑलिम्पिक भवनच्या उद्घाटनादरम्यान क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले, पुरस्कारातील वाद हे कायमचेच संपणार आहेत. सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचीच आहे. आम्ही एक स्वतंत्र समिती नेमली असून, ती समितीच अंतिम निर्णय घेईल, असे सांगत पुरस्काराचा वाद क्रीडामंत्र्यांनी एमओएच्या कोर्टात टाकला.

दरवर्षी पुरस्कार मागे पुढे होतात. गेल्यावर्षी शासनाने शिवजयंतीच्या पूर्वीच पुरस्कार दिले. मात्र, त्याआधी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार दिले आहेत. समितीच्या बैठकीनंतर हे पुरस्कार जाहीर होणार असून, क्रीडा खात्याने अहवाल शासनाला सादर केला आहे. येत्या काही दिवसांत शासनाकडून शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा करण्यात येईल.

– सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

हेही वाचा

Back to top button