खडकवासलामध्ये सुळे यांच्यासमोर आव्हान | पुढारी

खडकवासलामध्ये सुळे यांच्यासमोर आव्हान

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे आहे. लोकसभा निवडणुकीत खडकवासलाचे पन्नास टक्क्यांहून अधिक मतदार भाजपला मतदान करतात. खडकवासला भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीशी झुंज देत बाजी मारली. त्यानंतर लागोपाठच्या दोन्ही निवडणुकांत आमदार तापकीर यांनी एकसंध राष्ट्रवादीला पराभूत केले.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत खडकवासला मतदारसंघाने खा. सुप्रिया सुळे यांना आघाडी दिली नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांनी 70 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत खा. सुळे यांना केवळ 85 हजार 993 मते मिळाली, तर कुल यांना 1 लाख 52 हजार 487 अशी विक्रमी मते मिळाली होती. तर, 2014 च्या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी खा. सुळे यांच्यापेक्षा 20 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत खा. सुळे यांना 70 हजार 602 मते, तर जानकर यांना 98 हजार 729 मते मिळाली होती.

खडकवासला हा शहरी व ग्रामीण, असा संमिश्र मतदारसंघ आहे. पश्चिम हवेली सिंहगडच्या ग्रामीण भागाचा अपवाद वगळता शहरी भागात खा. सुळे यांना अधिक मतदान मिळाले नाही. ग्रामीण भागातील मतदार केवळ 30 टक्केच आहे, तर शहरी मतदार 70 टक्के आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी मुळे खा. सुळे यांच्यासमोर खडकवासलात मोठे आव्हान उभे आहे. पक्षफुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर, माजी नगरसेवक असे मातब्बर नेते भाजपच्या वाटेवर आहेत. तर, अनेक मंडळी अद्यापही संभ—मात आहेत. ते राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, खडकवासला राष्ट्रवादीचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडगे,विशाल तांबे आदी प्रमुख कार्यकर्ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, खडकवासलाचे माजी सरपंच सौरभ मते आदीसह जिल्हा बँकेचे संचालक, हवेली बाजार समितीचे संचालक आदी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे खडकवासलातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. कोणत्या गटात जावे, असे ज्येष्ठांसह युवकांसमोर प्रश्न आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) व काँग्रेस आहे. दहा वर्षांपूर्वी शिवसेनेची खडकवासलामध्ये चांगली ताकद होती. मात्र, हळूहळू ताकद कमी होत गेली. आता शिवसेनेच्या फुटीमुळे शिवसेनेच्या दोन गटांत कार्यकर्ते विभागले गेले आहेत, तर मातब्बर भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची ताकदही कमी झाली आहे. खडकवासलाचे मतदार भाजपला साथ देत असल्याने गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार प्रचार केला होता, तरीही मताधिक्य मिळाले नाही. उलट 70 हजार मतांच्या पिछाडीवर खा. सुळे यांना राहावे लागले. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे (शरद पवार गट) मोठ्या ताकदीचा नेता नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मतभेद, गट आहेत. आपापसांतील मतभेदांमुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांचा अल्प मतांनी पराभव झाला. आता राष्ट्रवादीच्या दोन गटांत कार्यकर्ते विभागले गेले असले, तरी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांतील मतभेद अजून संपले नाहीत.

राष्ट्रवादी एकसंध असतानाही सुळेंना पिछाडीच
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही खडकवासलामध्ये खा. सुळे यांना मोठी धावपळ करावी लागली. एकसंध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज तसेच काँग्रेस व मित्रपक्षांची युती असतानाही खडकवासलामध्ये खा. सुळे यांना आघाडी घेता आली नाही.

Back to top button