Pune : मार्कंडेय सूतगिरणी कामगारांच्या लढ्याला यश | पुढारी

Pune : मार्कंडेय सूतगिरणी कामगारांच्या लढ्याला यश

भोर : पुढारी वृत्तसेवा :  श्री मार्कंडेय हातमाग सहकारी सूतगिरणीच्या 660 कामगारांच्या लढ्याला यश आले आहे. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांचे पगार, पगारी रजा, बोनस, अंशदान यांची 61 लाख रुपयांची रक्कम कामगारांना मंगळवारी (दि. 13) धनादेशाने देण्यात आल्याची माहिती सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी दिली. सन 1972 मध्ये सुरू झालेली यशवंत सहकारी हातमाग सूतगिरणी 1985 साली बंद झाली. त्यांनतर या सूतगिरणीचे हस्तांतरण होऊन तिचे नामकरण श्री मार्कंडेय हातमाग विणकर सहकारी सूतगिरणी असे झाले. 1995 साली सूतगिरणी अवसायानात निघाली. त्यामुळे कामगारांचे पगार, पगारी रजा, बोनस, अंशदान याचे मिळून सुमारे 75 लाख 73 हजार 742 रुपयांचे देणे थकले होते.

यासाठी कामगारांनी न्यायालयीन लढा दिला. सदर सूतगिरणीच्या जुन्या मालमत्तेचे मूल्यांकन 17 लाख रुपये करण्यात आले. कामगारांच्या सुदैवाने 17 लाख रुपये मूल्यांकन झालेल्या मालमत्तेचे, स्क्रॅप मटेरिअलचे ई-लिलावात सुमारे 83 लाख 83 हजार मिळाले. यातील काही कामगारांचे 15 लाख रुपयांचे देणे डिसेंबर 2017 मध्येच देण्यात आले होते. उर्वरित कामगारांचे 61 लाखांच्या रकमेचे वाटप करण्यात आले. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार मिळणार्‍या रकमेच्या धनादेशाचे वाटप भोरच्या राजवाडा सहायक निबंधक कार्यालयात मंगळवारी सहायक निबंधक व या सूतगिरणीचे अवसायक बाळासाहेब तावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांच्या रखडलेल्या रकमेवर 1 कोटी 18 लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे. ते पुढील टप्प्यात देण्यात येणार आहे, असे तावरे यांनी सांगितले.

कामगारांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
तीस वर्षे रखडलेले देणे मिळाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले. धनादेश स्वीकारताना काही कामगारांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. सहायक निबंधक तावरे, कामगारनेते अरुण जाधव, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब शिळीमकर यांच्या लढ्यामुळे कामगारांना न्याय मिळाला, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली.

Back to top button