कथित सेक्स स्कँडल प्रकरण : प्रज्वल रेवन्नांविरोधात लुकआउट नोटीस | पुढारी

कथित सेक्स स्कँडल प्रकरण : प्रज्वल रेवन्नांविरोधात लुकआउट नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कथित सेक्स स्कँडल (Sex Scandal Case) प्रकरणी विशेष तपास पथकाने आज (दि.२ मे) माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. यापूर्वी तपास पथकाने प्रज्वल आणि त्याचे वडील एचडी रेवन्ना यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

रेवन्ना यांच्या घरात घरात काम करणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून या पिता-पुत्र दोघांविरुद्ध लैंगिक छळ, पाठलाग करणे, धमकावणे आणि महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नोटीस दिल्याप्रमाणे एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना यांना चौकशीला हजर राहावे लागेल. ते गैरहजर राहिल्‍यास त्यांना अटक केली जाईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

प्रज्ज्वल यांचे महिलांसह आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाले. महिलांवर दबाव आणून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीडितांमध्ये काही शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येते. यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाने २६ एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. विशेष तपास पथक नेमावे, असेही राज्य सरकारला सुचविले होते. त्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. दरम्यान, प्रज्वल रेवन्ना यांचा सहभाग असलेल्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे एफआयआर पाठवण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील प्रज्वल रेवन्ना यांच्यावरील लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांबाबत कर्नाटक पोलिसांकडून तीन दिवसांत सविस्तर अहवाल मागवला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सोशल मीडियावर असंख्य आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओंमध्ये प्रज्वल रेवन्ना अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे दिसून आले आहे.
प्रज्वल रेवन्ना २६ एप्रिल रोजी कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर देश सोडून गेल्याचे समजते. यावरून महिला आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रज्वल रेवन्ना हे हसन लोकसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार आहेत. येथे गेल्या शुक्रवारी मतदान पार पडले. काही आक्षेपार्ह व्हिडिओंवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रज्वल रेवन्ना यांना JD(S) मधून निलंबित करण्यात आले. दरम्यान, एच.डी. रेवन्ना यांनी, त्यांचा मुलगा प्रज्वल आणि ते स्वत: त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी तयार आहेत आणि आरोप सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कारवाईला सामोरे जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकातील एका भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली होती. मला सरकारी अधिकाऱ्यांसह महिलांचे सुमारे ३ हजार व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये राज्याच्या पक्षाध्यक्षांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (former Prime Minister and JD(S) supremo HD Deve Gowda) यांचे नातू तसेच कर्नाटकातील हसन लोकसभा खासदार आणि जेडीएसचे (जनता दल सेक्युलर) उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. या फुटेजचा वापर महिलांना ब्लॅकमेल करून त्यांना सतत लैंगिक कृत्यांमध्ये गुंतण्यासाठी केला असल्याचाही आरोप रेवन्ना यांच्यावर करण्यात आला आहे. (Sex Scandal Case)

तब्बल २,९७६ व्हिडिओ

८ डिसेंबर २०२३ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना लिहिलेल्या एका पत्रात, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे होलेनर्सीपुराचे उमेदवार देवराजे गौडा म्हणाले होते, “प्रज्वल रेवन्ना यांच्यासह एच.डी. देवेगौडा कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप आहेत.” पेन ड्राइव्हमध्ये एकूण २,९७६ व्हिडिओ आहेत आणि फुटेजमध्ये दिसलेल्या काही महिला सरकारी अधिकारी होत्या, असेही देवराजे गौडा म्हणाले होते. या व्हिडिओचा वापर त्यांना लैंगिक कृत्यांमध्ये सतत गुंतवून ठेवून ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात होता”, असेही दावा त्यांनी केला होता. (Prajwal Revanna Scandal case) भाजप नेत्याने पुढे असाही दावा केला की हे व्हिडिओ आणि फोटो असलेला आणखी एक पेन ड्राइव्ह काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपर्यंत पोहोचला आहे.

 

Back to top button