चाकणच्या संग्रामदुर्गात आढळल्या वीरगळ | पुढारी

चाकणच्या संग्रामदुर्गात आढळल्या वीरगळ

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  प्राचीन काळात युद्धात आणि रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय संस्कृतीत अत्यंत अभिमानाचे लक्षण मानले जात होते. रणांगणावर मरण आलेल्या वीराचे स्मारक वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारली गेली आहेत. अशीच काही वीरगळ चाकण (ता. खेड) भागात आजही पहावयास मिळतात. शेकडो वर्षांनंतरही अज्ञात वीरांच्या कहाण्या सांगणारे वीरगळ चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यातदेखील दिसून येतात. यातील अनेक वीरगळ भलेही फारसे कलात्मक नाहीत; मात्र त्या निर्जीव दगडाला स्वत:चा जिवंत इतिहास आहे. चाकण पालिकेने या किल्ल्याची पाहणी केली, त्या वेळी हे वीरगळ दिसून आले. याबाबत माहिती देताना फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, किल्ल्याच्या खंदकात अशा वीरगळ आढळून आल्या असून त्या एका ठिकाणी आणून ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय काही पुरातन विष्णू मूर्तीदेखील आढळून आल्या असून त्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत.फफ

किल्ल्याची प्रशासनाकडून पाहणी
चाकण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चाकण पालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने चाकण नगरपरिषदेने संग्रामदुर्ग किल्ल्याची सोमवारी (दि. 13) पाहणी केली. चाकण पालिकेने पुरातत्व विभागास संग्रामदुर्ग किल्ले येथे स्वच्छता अभियान, पथदिवे, किल्ला खंदक स्वच्छतेसह सुरक्षारक्षक नेमणूक तसेच किल्ल्यात दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय पद्धतीने जयंती साजरी करण्यासाठी ना हरकत परवानगी मिळावी यासाठी पत्र दिले आहे. सोमवारी चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी नगरपरिषदच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत किल्ला पाहणी केली. या प्रसंगी अ‍ॅड. नीलेश कड पाटील यांच्यासह फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अ‍ॅड. किरण झिंजुरके, राहुल वाडेकर आदी उपस्थित होते.

Back to top button